कमर्शियल चिफ इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांचे विशेष प्रयत्न
कर्जत रेल्वे पॅसेंजर असोसिएशनच्या पाठपुराव्याला यश
अशोक गायकवाड
कर्जत : कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील हजारो प्रवाशांसाठी दिलासादायक निर्णय घेण्यात आला असून, भिसेगाव बाजूच्या तिकीट बुकिंग खिडकीचे कामकाज शनिवारपासून दोन शिफ्टमध्ये सुरू करण्यात आले आहे. या निर्णयामुळे प्रवाशांची गैरसोय कमी होण्यास मदत होणार असून, तिकीट काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ आणि सोयीस्कर होणार आहे. मागील अनेक महिन्यांपासून कर्जत रेल्वे पॅसेंजर्स असोसिएशनकडून या संदर्भात सातत्याने पाठपुरावा करण्यात येत होता. विशेषतः सकाळ आणि सायंकाळच्या गर्दीच्या वेळेत प्रवाशांना लांबच लांब रांगा, वेळेचा अपव्यय आणि तिकीट मिळवण्यासाठी होणारा त्रास यामुळे ही मागणी अधिक जोर धरत होती. प्रवाशांची वाढती संख्या आणि वाढती गर्दी लक्षात घेऊन रेल्वे प्रशासनाने अखेर सकारात्मक निर्णय घेतला आहे. यासाठी कमर्शियल चिफ इन्स्पेक्टर शिरीष कांबळे यांनी वरिष्ठ रेल्वे अधिकाऱ्यांशी सातत्याने संपर्क ठेवत विशेष पाठपुरावा केला. त्यांच्या प्रयत्नांमुळे हा प्रश्न मार्गी लागल्याचे सांगितले जात आहे. या नव्या व्यवस्थेमुळे भिसेगाव परिसरातील तसेच स्थानकाच्या त्या बाजूने ये-जा करणाऱ्या प्रवाशांना मोठा फायदा होणार आहे. विशेषतः कार्यालयीन कर्मचारी, विद्यार्थी आणि नियमित प्रवाशांसाठी ही सुविधा अधिक उपयुक्त ठरणार आहे.
तिकीट बुकिंग खिडकीचे वेळापत्रक पुढीलप्रमाणे :
पहिली शिफ्ट : सकाळी ६.३० ते दुपारी २.३० ️ जेवणाची वेळ : दुपारी १२.१५ ते १२.३५ हिशोबाची वेळ : दुपारी २.३० ते २.४५ ️ दुसरी शिफ्ट : दुपारी २.४५ ते रात्री १०.३० ️ जेवणाची वेळ : रात्री ८.४० ते ९.०० या निर्णयामुळे कर्जत रेल्वे स्थानक परिसरातील प्रवाशांची गैरसोय मोठ्या प्रमाणात कमी होणार असून, रेल्वे प्रशासनाच्या या निर्णयाचे प्रवाशांकडून स्वागत केले जात आहे.
००००००००
