ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रात एमएमआरडीए मार्फत आनंदनगर ते साकेत पर्यत एलिव्हेटेड रोडचे कामादरम्यान इंदिरा नगर संपकडे जाणारी ८१३ मि.मी व्यासाची उर्ध्ववाहिनी बाधित होत असल्याने एमएमआरडीएकडून ९०० मि.मी व्यासाची जलवाहिनी २२०० मीटरपैकी ८०० मीटर अंतरापर्यत अंथरण्याचे काम पूर्ण झाले आहे. ८०० मीटर अंतरापर्यत अस्तित्वातील ८१३ मि.मी व्यासाची जलवाहिनी निकामी करुन नव्याने अंथरण्यात आलेली ९०० मि.मी व्यासाची जलवाहिनी कार्यान्वित करण्याकरिता जलवाहिनीच्या जोडकामासाठी पाणीपुरवठा बंद ठेवण्याची मागणी केली आहे. सदर कामाकरिता शुक्रवार १२ जून रोजी सकाळी ९.०० ते शनिवार १३ जून रोजी सकाळी ९.०० वाजेपर्यत एकूण २४ तास पाणीपुरवठा बंद राहणार आहे.
या शटडाऊन कालावधीत ठाणे महापालिकेअंतर्गत इंदिरानगर, साठेनगर, आंबेवाडी, डवलेनगर, सावरकरनगर, लोकमान्य नगर पाडा नं. २,३, व ४, चैतीनगर, परेरानगर, झांजेनगर, श्रीनगर, किसननगर, शिवटेकडी, शांतीनगर, कैलासनगर, भटवाडी, वारलीपाडा, रुपादेवी पाडा, रामनगर, सी.पी.तलाव, येऊर परिसर इत्यादी भागाचा पाणीपुरवठा २४ तासांसाठी पूर्णपणे बंद राहील. पाणीपरुवठा सुरू झाल्यानंतर पुढील १ ते २ दिवस कमी दाबाने पाणीपुरवठा होईल याची नागरिकांनी नोंद घ्यावी. ठाणे महानगरपालिकेमार्फत सदर कपातीच्या कालावधीत पाणी काटकसरीने वापरुन ठाणे महानगरपालिकेस सहकार्य करावे असे आवाहन पालिकेच्यावतीने करण्यात आले आहे.
