सय्यद आफरीन यांचा भाजपला प्रश्न
मिरा -भाईंदर :
काशीमिरा पोलीस ठाण्यात दाखल झालेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणामुळे संपूर्ण शहरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे. या प्रकरणात महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांचे सख्खे भाऊ राजेश चव्हाण यांना अटक करण्यात आली असून, त्यांच्या दुसऱ्या भावाचे नावही तक्रारीत समोर आले आहे.
या गंभीर प्रकरणावर प्रतिक्रिया देताना मिरा -भाईंदर महानगरपालिकेच्या विरोधी पक्षनेत्या सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांनी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती अनिता पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ आपल्या पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन म्हणाल्या की, “महिला आणि बालकांच्या संरक्षणासाठी कार्य करणाऱ्या समितीच्या सभापतींच्या निकटवर्तीयांवर अशा गंभीर स्वरूपाचे आरोप होणे ही अत्यंत गंभीर बाब आहे. या घटनेमुळे महिला व बालकल्याण समितीच्या विश्वासार्हतेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. त्यामुळे निष्पक्ष चौकशीसाठी आणि समितीची प्रतिष्ठा कायम राखण्यासाठी सभापतींनी तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा.”
तसेच या प्रकरणाची उच्चस्तरीय व निष्पक्ष चौकशी करून पीडितेला न्याय मिळावा आणि दोषींवर कठोर कारवाई करण्यात यावी, अशी मागणीही त्यांनी केली. महिलांच्या सुरक्षिततेच्या प्रश्नावर कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही, असेही त्यांनी स्पष्ट केले. महिलांच्या सन्मान व सुरक्षेच्या प्रश्नावर प्रशासनाने तातडीने ठोस भूमिका घ्यावी, अन्यथा जनतेसोबत रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशाराही सय्यद आफरीन मुझफ्फर हुसेन यांनी दिला आहे.
