मिरा-भाईंदर : मिरा-भाईंदर महानगरपालिकेच्या महिला व बालकल्याण समितीच्या सभापती सौ. अनिता पाटील यांच्या सख्ख्या भावावर गंभीर स्वरूपाचे आरोप झाल्यानंतर या प्रकरणावरून राजकीय वातावरण तापले आहे. संबंधित घटनेमुळे शहराची प्रतिमा मलिन झाल्याचा आरोप करत महाराष्ट्र प्रदेश युवक काँग्रेसच्या उपाध्यक्षा तथा युवा नेत्या आफरीन सय्यद यांनी अनिता पाटील यांनी नैतिक जबाबदारी स्वीकारून तात्काळ पदाचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली आहे.
पत्रकार परिषदेत बोलताना आफरीन सय्यद म्हणाल्या की, महिला व बालकल्याण समिती हे महिलांच्या आणि बालकांच्या संरक्षणाशी संबंधित अत्यंत संवेदनशील पद आहे. त्यामुळे या प्रकरणाची निष्पक्ष चौकशी होण्यासाठी आणि समितीवरील नागरिकांचा विश्वास कायम राखण्यासाठी सभापतींनी पदाचा त्याग करणे आवश्यक आहे. याबाबत महापौरांकडे निवेदन सादर करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.
दरम्यान, शिवसेनेच्या महिला संघटक निशा नार्वेकर यांनीही पोलीस आयुक्त नितेश कौशिक यांना निवेदन देत नगरसेविका अनिता पाटील यांना या प्रकरणात सहआरोपी करून गुन्हा दाखल करण्याची मागणी केली आहे. पीडित मुलगी आणि तिच्या आईला वारंवार धमकावून तोंड बंद ठेवण्यास सांगितल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
या सर्व आरोपांची सखोल व निष्पक्ष चौकशी करून सत्य समोर आणावे, अशी मागणी विविध स्तरांतून होत आहे. पोलीस प्रशासनाकडून प्रकरणाचा तपास सुरू असून पुढील घडामोडींवर सर्वांचे लक्ष लागले आहे.
