नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने आरोग्य सेवा बळकटीकरणांतर्गत विविध आरोग्य सुविधांचे लोकार्पण व कामांचा शुभारंभ आज सकाळी ११ वाजता महाराष्ट्र राज्याचे वन मंत्री गणेश नाईक यांच्या शुभहस्ते, नवी मुंबईच्या महापौर सुजाता पाटील यांच्या अध्यक्षतेखाली वाशी सेक्टर १० येथील सार्वजनिक रूग्णालय येथे संपन्न होत आहे.
याप्रसंगी ठाणे लोकसभा सदस्य नरेश म्हस्के, कल्याण लोकसभा सदस्य डॉ.श्रीकांत शिंदे, विधानपरिषद सदस्य निरंजन डावखरे व ज्ञानेश्वर म्हात्रे, बेलापूर विधानसभा सदस्य मंदाताई म्हात्रे, कल्याण ग्रामीण विधानसभा सदस्य राजेश मोरे हे मान्यवर मुख्य अतिथी म्हणून तसेच उपमहापौर दशरथ भगत, आयुक्त डॉ.कैलास शिंदे, स्थायी समिती सभापती अशोक पाटील, सभागृह नेते सागर नाईक, विरोधी पक्ष नेते विजय चौगुले, परिवहन समिती सभापती विकास झंजाड हे मान्यवर प्रमुख अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत. त्याचप्रमाणे महानगरपालिकेचे विविध समित्यांचे सभापती सन्माननीय अतिथी म्हणून उपस्थित राहणार आहेत.
नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने नागरिकांना पुरविण्यात येणा-या आरोग्य सेवांमध्ये या माध्यमातून भरीव वाढ करण्यात येत आहे. या आरोग्य सुविधांमध्ये – नमुंमपा आणि गणेश नाईक यांच्या स्थानिक विकास आमदार निधीतून उभारण्यात आलेले स्वामी विवेकानंद भवन, से.१४, वाशी येथील डायलिसीस सेंटरचे लोकार्पण होत आहे. तसेच सार्वजनिक रूग्णालय, सेक्टर १०, वाशी येथे –एम.आर.आय. सेंटर लोकार्पण, मध्यवर्ती निर्जंतुकीकरण विभाग (सी.एस.एस.डी.) कार्यान्वित करणे, रूग्णालय बेड्स उपलब्धता डॅशबोर्ड कार्यान्वित करणे, वाशी आणि ऐरोली येथे ह्रदयविकार उपचार केंद्र (कॅथलॅब) कामाचा शुभारंभ, मिल्क बँक सुविधा लोकार्पण, मॉड्युलर मॉर्च्युरी (शवागृह) कार्यान्वित करणे आदी सुविधा त्याचप्रमाणे डॉ.बाबासाहेब आंबेडकर भवन, सेक्टर ८, सीबीडी बेलापूर येथील डायलिसीस सेंटर लोकार्पण आणि सेक्टर २४, जुईनगर येथील पशुवैद्यकीय रूग्णालय लोकार्पण तसेच महापे येथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र लोकार्पण आदी विविध आरोग्य सुविधांचा समावेश आहे.
नागरिकांना उत्तम दर्जाच्या आरोग्य सुविधा पुरविण्याच्या दृष्टीने हे एक महत्वाचे पाऊल असून या कार्यक्रमाप्रसंगी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन कार्यक्रमाचे निमंत्रक आरोग्य परिरक्षण व वैद्यकिय सहाय्य समितीचे सभापती डॉ.जयाजी नाथ आणि उपसभापती गणेश सकपाळ तसेच सर्व समिती सदस्य यांच्या वतीने करण्यात येत आहे.
