कल्याण : कल्याण-डोंबिवलीतील वालधुनी नदी पुनर्जीवित करण्याची मागणी नागरिक आणि सामाजिक कार्यकर्त्यांकडून सातत्याने केली जात आहे. याच पार्श्वभूमीवर कल्याण डोंबिवली महानगरपालिका आयुक्त अभिनव गोयल, महापौर हर्षाली चौधरी, नगरसेविका अनघा देवळेकर आणि इतर अधिकारी पदाधिकारी यांनी वालधुनी नदी परिसराची पाहणी केली.
वालधुनी नदीचे पुनरुज्जीवन करण्यासाठी कोणकोणत्या उपाययोजना करता येतील, याबाबत अधिकाऱ्यांना सूचना देण्यात आल्या आहेत. नदी स्वच्छता, प्रदूषण नियंत्रण आणि परिसराचा विकास यावर यावेळी चर्चा करण्यात आली. या पाहणीदरम्यान, नदीची सद्यस्थिती, अतिक्रमणे आणि प्रदूषणाच्या प्रमुख स्रोतांचा आढावा घेण्यात आला. नदीची स्वच्छता, सांडपाणी रोखणे, अतिक्रमणे हटवणे आणि नदीकिनारा विकसित करण्यासाठी एक सविस्तर कृती आराखडा तयार करण्याचे निर्देश महापौरांनी अधिकाऱ्यांना दिले. नदीचा स्वच्छ आणि अखंड प्रवाह सुनिश्चित करण्यासाठी टप्प्याटप्प्याने उपाययोजना करण्यावर बैठकीत चर्चा झाली.
नदीच्या पाहणीनंतर, आयुक्त आणि महापौरांनी कल्याण स्टेशन परिसरात असलेल्या सॅटीस प्रकल्पालाही भेट दिली. दररोज होणारी वाहतूक कोंडी, फेरीवाल्यांनी केलेली बेकायदेशीर अतिक्रमणे आणि प्रवाशांना होणारा त्रास यांचा आढावा घेण्यात आला. दरम्यान, वाहतूक कोंडी कमी करण्यासाठी आणि पादचाऱ्यांना सोयीसुविधा पुरवण्यासाठी तातडीने उपाययोजना करण्याचे निर्देश महानगरपालिका अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.
००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *