मुकुंद रांजाणे
माथेरान : धनाढ्य मंडळींनी बिनधास्तपणे अव्वाच्या सव्वा बांधकामे करा आम्ही तुमच्या सोबत आहोत अशीच काहीशी भूमिका बजावत माथेरान नगरपालिका प्रशासन अधिकारी आणि त्यांना सर्वतोपरी सहकार्य करणाऱ्या सत्तेतील ज्या लोकप्रतिनिधींचे पाठबळ आहे.त्याबद्दल स्थानिक मंडळींमधून तीव्र संताप व्यक्त केला जात आहे.एकीकडे पिढ्यानपिढ्या वास्तव्यास असणाऱ्या भूमिपुत्रांना स्वतःचा निवारा उभारण्यासाठी बांधकाम साहित्य आणण्यास बंदी घातली जाते आणि दुसरीकडे धनाढ्य लोकांच्या बांधकामांना आर्थिक लोभापायी अभय देण्याची भूमिका पार पाडली जात असल्याने सत्तेचा गैरवापर होत असल्याचे नागरिकांमधून उघडपणे बोलले जात आहे. येथील अलेक्झांडर हॉटेलमध्ये विनापरवाना बांधकामांना उत आला असून या पर्यावरण दृष्टीने संवेदनशील असणाऱ्या माथेरानमध्ये सनियंत्रण समिती, हेरिटेज कमिटीची कोणत्याही प्रकारची पूर्वपरवानगी घेतलेली नसून नगरपालिके मधून किरकोळ दुरुस्ती परवानगीच्या नावावर मोठया प्रमाणात अतिक्रमीत बांधकाम सुरू केले आहे.याबाबत शिवराष्ट्र पॅनेलचे विरोधी पक्षनेते,नगरसेवक यांनी
मुख्याधिका-यांना लेखी निवेदन सादर करून अलेक्झांडर हॉटेलमध्ये सुरू असलेले विनापरवाना बांधकाम त्वरीत बंद करण्यात यावे असे निवेदनात म्हटले आहे. परंतु सद्यस्थितीत पालिका प्रशासन अधिकारी आणि त्यांना साथ देणाऱ्या लोकप्रतिनिधीनी याबाबत मौन पाळले असून एकप्रकारे निवेदनाला केराची टोपली दाखविल्या सारखेच आहे. एकीकडे नगरपालिका वृक्षारोपण कार्यक्रमाचा दिखावा करत असून दुसरीकडे झाडांची कत्तल करण्यास धनाढ्य लोकांना मुभा दिली जात आहे. याच अलेक्झांडर हॉटेलमध्ये पर्यटकांसाठी विनापरवाना तंबू लावून व्यवसाय केला जात आहे. दोन वर्षांपूर्वी अशाच एका तंबूवर झाड कोसळून पर्यटक मुलीचा गंभीर अपघात झाला होता.तरीसुद्धा ह्या हॉटेलच्या आवारात तंबू लावण्यात आले आहेत. विनापरवाना बांधकामांना पाठबळ एकटा अधिकारी देऊ शकत नाही त्यांच्या मागे भक्कम आधार हा सत्तेतील काही लोकप्रतिनिधींचा आहे त्यामुळेच मोठमोठ्या बंगल्याची कामे सर्रासपणे झाडांची कत्तल करून सुरू आहेत. अशीच परिस्थिती यापुढेही राहिली तर माथेरानचा आगामी काळ पर्यटनास धोकादायक ठरू शकतो असे जेष्ठ मंडळी बोलत आहेत.
————————————————–
अलेक्झांडर हॉटेलमध्ये सुरू असलेले विनापरवाना बांधकाम त्वरित थांबविण्यात यावे.याठिकाणी मोठया प्रमाणावर वृक्षतोड सुध्दा करण्यात आली असून पर्यटकांसाठी तंबू लावून व्यवसाय सुरू आहे, स्विमिंग पुलाचे सुध्दा काम सुरू असून या सर्व कामांना सनियंत्रण समितीची कोणत्याही प्रकारची वैध परवानगी नसताना कामे कशी सुरू आहेत याबाबत मागील आठवड्यात निवेदन दिले आहे परंतु मुख्याधिका-यांनी काहीच उत्तर दिलेले नाही.
सीताराम कुंभार—-विरोधी पक्षनेते माथेरान
