कल्याण : शहाड ते आंबिवली रेल्वे स्थानकादरम्यान धावणाऱ्या अमरावती एक्सप्रेसमध्ये प्रवाशाच्या हातावर बांबूने फटका मारून त्याचा महागडा मोबाईल पाडून चोरी करणाऱ्या फटका गँगच्या एका सराईत चोरट्याला कल्याण लोहमार्ग पोलिसांनी मोठ्या शिताफीने अटक केली आहे. अटक करण्यात आलेल्या आरोपीकडून फिर्यादीचा चोरीस गेलेला मोबाईलही हस्तगत करण्यात आला आहे. हसन जफर असे या चोरट्यानेचे नाव आहे.
अमरावती एक्सप्रेसमधून प्रवास करणाऱ्या एका प्रवाशाच्या हातावर बांबूने फटका मारून त्याचा मोबाईल खाली पाडण्यात आला होता. मोबाईल पडताच आरोपीने तो लंपास केला. या प्रकरणी पीडित प्रवाशाने कल्याण लोहमार्ग पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. तक्रारीनंतर लोहमार्ग पोलिसांनी घटनास्थळ परिसरातील माहिती गोळा करून तपास सुरू केला. आरोपी पुन्हा अशाच प्रकारचा गुन्हा करण्याच्या तयारीत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी सापळा रचून हसन दारा जफर या फटका गँगच्या सदस्याला रंगेहात ताब्यात घेतले.
चौकशीदरम्यान आरोपीकडून फिर्यादीचा चोरीस गेलेला मोबाईल जप्त करण्यात आला आहे. तसेच आरोपीने यापूर्वी अशाच पद्धतीने आणखी किती मोबाईल चोरी केले आहेत, याबाबतही पोलिसांकडून सखोल तपास सुरू आहे. या तपासातून आणखी गुन्ह्यांची उकल होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. ही कारवाई वरिष्ठ पोलीस निरीक्षक पंढरीनाथ कांदे यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याण लोहमार्ग पोलीस पथकाने केली असून, आरोपीकडून अधिक माहिती मिळविण्यासाठी पुढील तपास सुरू आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *