नगरसेविका रेश्मा निचळ यांचा उपक्रम
कल्याण : शिवसेना, ताठे स्टाफिंग आणि के. सोपानराव निचळ फौडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित भव्य रोजगार मेळाव्यात कल्याण पूर्वेतील अनेक बेरोजगार तरुण तरुणींना रोजगार मिळाला. केडीएमसीच्या प्रभाग क्र. ११ च्या शिवसेना नगरसेविका रेश्मा निचळ आणि विभाग प्रमुख किरण निचळ यांच्या वतीने या रोजगार मेळाव्याचे आयोजन शनिवारी निचळ यांच्या जनसंपर्क कार्यालयात करण्यात आले होते.
या मेळाव्यात नामांकित कंपन्या सहभागी झाल्या असून १०वी, १२वी, आयटीआय, डिप्लोमा तसेच सर्व शाखांच्या पदवीधर उमेदवारांच्या मुलाखती घेऊन त्यांना रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात आली. यावेळी विविध क्षेत्रातील नामांकित कंपन्या सहभागी झाल्या होत्या. याठिकाणी थेट मुलाखत घेऊन त्वरित निवड प्रक्रिया राबविण्यात आली. यामध्ये अनुभवी आणि फ्रेशर या दोघांसाठीही संधी उपलब्ध करून देण्यात आली. तसेच आलेल्या उमेदवारांना करिअर बाबत मार्गदर्शन देखील करण्यात आले. यावेळी निवड झालेल्या उमेदवारांना तात्काळ नियुक्तीपत्र देण्यात आले असून सोमवार पासून ते कामाच्या ठिकाणी रुजू देखील होणार आहेत. या रोजगार मिळालेल्या युवकांनी नगरसेविका रेश्मा निचळ आणि विभाग प्रमुख किरण निचळ यांचे आभार मानले.
