ज्येष्ठ नागरिक संघाचे सदस्य गहिवरले
मुंबई, दि. (प्रतिनिधी): स्वर हार्मनी वाद्यवृंदाचे खंदे गायक आणि ज्येष्ठ नागरिक संघाचे लाडके सदस्य रविंद्र रानडे यांचे आकस्मिक निधन झाल्यानंतर बोरीवली पूर्व येथील वैश्य समाज मुंबई यांच्या सदडेकर सभागृहात आयोजित करण्यात आलेल्या ज्येष्ठ नागरिक संघाच्या बैठकीत सूरस्वरांजली अर्पण करण्यात आली. यावेळी अवघे सभागृह हेलावले. ज्येष्ठ नागरिक संघाच्या अध्यक्षा शमा शेडगे यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत उपाध्यक्ष स्मीता चितळे, उपाध्यक्ष संजय देशपांडे, तात्यासाहेब पिंपळे, गजानन बर्वे, चंद्रशेखर ठाकूर, मनीषा जोशी, अलका वठारकर, प्रतिमा मोरे, अश्विनी पुराणिक, विजया केसाळे, सुभाष लाड, भारती दैवज्ञ आदींनी रविंद्र रानडे यांच्या आठवणी जागवल्या. रविंद्र रानडे यांचे सहकारी आणि उपाध्यक्ष संजय देशपांडे यांनी रविंद्र रानडे यांनी गायलेल्या गाण्यांच्या ध्वनीफिती ऐकवल्या तेंव्हा सर्वांच्या अंगावर शहारे आले. या बैठकीत रविंद्र रानडे हे स्वतः गात असल्याचा भास निर्माण झाला. रविंद्र रानडे यांचे सुपुत्र निनाद यांनी आपल्या कुटुंबियांतर्फे कृतज्ञता व्यक्त केली तर रविंद्र रानडे यांच्या स्नुषा सौ. उदिता निनाद रानडे यांनी आपल्या श्वसुरांचे आवडते रामाचे गाणे गायले. रविंद्र रानडे, संजय देशपांडे आणि सुरेंद्र कामत हे ज्येष्ठ नागरिक संघात ब्रह्मा विष्णू महेश म्हणून ओळखण्यात येत. त्यांच्या आठवणी सांगताना सुरेंद्र कामत यांना अश्रू अनावर झाले.
