प्रवाशांची दोन्ही बाजूंनी लूट
स्वच्छता कर वसूल करूनही प्रवाशी ‘मोफत’च्या लाभापासून वंचित
योगेश चांदेकर
पालघरः राज्याचे परिवहन मंत्री आणि महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी एक जूनपासून राज्यातील सर्व बसस्थानकावरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी निशुल्क करण्याची घोषणा केली; परंतु ही घोषणाच फसवी निघाली. स्वच्छतागृहे निशुल्क असल्याची घोषणा करताना प्रवाशांच्या माथ्यावर प्रत्येक तिकिटामागे दोन रुपये अधिभार लागू केला आहे. अधिभाराची वसुली सुरू झाली असताना दुसरीकडे अजूनही प्रवाशांकडून स्वच्छतागृहाच्या वापरासाठी पैसे आकारले जात आहे. प्रवाशांची ही दुहेरी लूट असून, एसटीचे प्रशासन आणि परिवहन मंत्र्यांचे याकडे लक्ष नाही.
एसटी महामंडळाने एक जूनपासून राज्यातील सर्व बसस्थानकांवरील स्वच्छतागृहे प्रवाशांसाठी पूर्णपणे मोफत (निशुल्क) केली आहेत, अशी घोषणा परिवहनमंत्री सरनाईक यांनी केली. त्यामुळे प्रवाशांनी समाधानाचा सुटकारा सोडला; परंतु प्रवाशांचा हा आनंद क्षणभंगुर ठरला. कोणत्याही बसस्थानकावर स्वच्छतागृहांचा वापर करण्यासाठी प्रवाशांना पैसे द्यावे लागणार नाहीत. स्थानक-आगारात दर चार तासांनी यांत्रिक पद्धतीने स्वच्छता राखण्याचे एसटी महामंडळाने बंधनकारक केले आहे, असे सांगून जर कोणत्याही स्थानकावर पैसे मागितले जात असल्यास किंवा स्वच्छता नसल्यास, थेट एसटी प्रशासनाकडे तक्रार करू शकता, असे सरनाईक यांनी सांगितले होते.
प्रवाशांच्या तक्रारी कायम
एसटी बसस्थानक तसेच आगारातील स्वच्छतागृहे स्वच्छ नसल्याच्या अनेक तक्रारी प्रवाशांकडून येत होत्या. इतकेच नव्हे, तर स्थानक-आगार परिसरातील अस्वच्छता आणि पाणपोईंची दुरवस्था पाहायला मिळते. यामुळे प्रवाशांनी नाक मुरडण्यास सुरुवात केली होती. या पार्श्वभूमीवर प्रवासी सुविधा वाढवण्यासाठी महामंडळाकडून स्वच्छता मोहीम राबवण्यात येत आहे. या मोहिमेअंतर्गत स्थानक आणि आगार परिसराची दर चार तासांनी स्वच्छता, पाणपोई सुरू करणे तसेच चालक-वाहकांच्या विश्रांतीगृहांमध्ये अधिक सुविधा उपलब्ध करून देण्यात येणार आहे, असे परिवहनमंत्र्यांनी दोन महिन्यांपूर्वीच सांगितले होते.
खासगी कंत्राटदारी व्यवस्था बंद असल्याचा दावा
सरनाईक यांनी दोन महिन्यांपूर्वी केलेल्या घोषणेनुसार, स्वच्छतागृहांच्या देखभालीसाठी असलेली खासगी कंत्राटदारी व्यवस्था आता बंद करण्यात आली आहे. पूर्वी कंत्राटदारांकडे जबाबदारी असूनही अस्वच्छतेच्या तक्रारी कायम येत असल्याच्या पार्श्वभूमीवर हा निर्णय घेण्यात आला असून, आता स्वच्छतागृहांची देखभाल आणि सर्व सुविधा पुरवण्याची जबाबदारी पूर्णपणे एसटी महामंडळाने स्वतःकडे घेतल्याचे सांगण्यात आले. राज्यातील सर्व आगारांमध्ये प्रवाशांना एकसमान आणि उत्तम सेवा मिळण्याचा मार्ग मोकळा झाला आहे. एसटी स्थानक-आगारांसह स्वच्छतागृहे, चालक-वाहकांची विश्रांतीगृहे, पाणपोई यांचा दर्जा सुधारण्यासाठी प्रतितिकीट दोन रुपये स्वच्छता अधिभार १५ एप्रिलपासून लागू करण्यात आला आहे.
प्रवासी-स्वच्छतागृह चालकांत वाद
सुलभ शौचालय, वाल्मिकी मेहतर समाज आणि एसटी महामंडळ अशा संस्थांकडून महामंडळाच्या स्वच्छतागृहांची स्वच्छता केली जाते. अनेक ठिकाणी याचा वापर करण्यासाठी पाच ते १० रुपये आकारले जातात. पैसे घेऊनही प्रवाशांकडून स्वच्छतेबाबत तक्रारी कायम आहेत. यामुळे ताब्यात असलेल्या स्वच्छतागृहांसह अन्य दोन्ही संस्थांकडील स्वच्छतागृहांचा वापर मोफत करण्याचा निर्णय घेण्यात आला. एसटीत ५६४हून अधिक स्वच्छतागृहे आहेत. एसटीच्या प्रवाशांकडून दोन महिन्यांत सुमारे ऐंशी कोटी रुपयांचा कर आकारूनही मंत्र्यांच्या घोषणेप्रमाणे प्रवाशांना निशुल्क सेवा मिळत नसल्याने प्रवाशी व स्वच्छतागृह चालकांत वाद होत आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *