वर्षांच्या इतिहासात विदर्भातून प्रथमच उपाध्यक्षपदाची निवडणूक
शताब्दीच्या उंबरठ्यावर महाराष्ट्र चेंबरची ऐतिहासिक झेप
मुंबई : महाराष्ट्र चेंबर ऑफ कॉमर्स, इंडस्ट्री अँड अॅग्रिकल्चर (मॅकिया)च्या २०२६-२८ या कार्यकाळासाठी झालेल्या निवडणुकांमध्ये रविंद्र माणगावे यांची अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली असून वरिष्ठ उपाध्यक्षपदी करुणाकर शेट्टी यांनी १,८८५ मतांनी विजय मिळवत आपले वर्चस्व सिद्ध केले. शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर उभ्या असलेल्या महाराष्ट्रातील व्यापारी, औद्योगिक आणि कृषी क्षेत्रातील या अग्रगण्य संस्थेच्या निवडणुका उत्साह, पारदर्शकता आणि सदस्यांच्या मोठ्या सहभागात पार पडल्या.
सुमारे ७ हजार थेट सदस्य आणि २० लाखांहून अधिक व्यापारी, उद्योजक व औद्योगिक घटकांचे प्रतिनिधित्व करणाऱ्या महाराष्ट्र चेंबरने या निवडणुकांद्वारे लोकशाही परंपरेचे दर्शन घडविले. अध्यक्षपदी बिनविरोध निवड झालेल्या रविंद्र माणगावे यांच्या नेतृत्वावर सदस्यांनी पुन्हा एकदा विश्वास व्यक्त केला आहे. उद्योग, व्यापार आणि कृषी क्षेत्रातील त्यांच्या कार्याची दखल म्हणून ही निवड झाल्याचे मानले जात आहे.
यंदाच्या निवडणुकीत ‘एकता पॅनेल’च्या रोड रोलर आणि ‘प्रगती पॅनेल’च्या विमान या चिन्हांमधील लढत विशेष चर्चेचा विषय ठरली. वरिष्ठ उपाध्यक्षपदासाठी झालेल्या चुरशीच्या लढतीत करुणाकर शेट्टी यांनी प्रभावी विजय मिळवला. उपाध्यक्षपदासाठी सुनिता फाल्गुने (नाशिक), संतोष राणे (कोकण) आणि महेंद्र अगरवाल (उत्तर महाराष्ट्र) यांनी विजय संपादन केला.
मुंबई-१ विभागातून डॉ. धनश्री हरदास, मुंबई-२ मधून किरण भोसले, पश्चिम महाराष्ट्र-१ मधून संजय शेटे, पश्चिम महाराष्ट्र-२ मधून सरजेराव नलावडे, मराठवाड्यातून संजय किर्दत आणि विदर्भातून सिद्धार्थ रुहाटिया यांची उपाध्यक्षपदी बिनविरोध निवड झाली. तसेच मुंबई विभागातील २० गव्हर्निंग कौन्सिल सदस्यांसह विविध विभागांतील अनेक सदस्य बिनविरोध निवडून आले. यामुळे संस्थेतील एकजूट आणि परस्पर सहकार्याची भावना अधोरेखित झाली.
यंदाच्या निवडणुकीतील सर्वात उल्लेखनीय बाब म्हणजे महाराष्ट्र चेंबरच्या ९९ वर्षांच्या इतिहासात प्रथमच विदर्भ विभागातून उपाध्यक्ष पदासाठी निवडणूक झाली. राज्यातील सर्व विभागांना समान प्रतिनिधित्व देण्याच्या दृष्टीने हा ऐतिहासिक क्षण मानला जात आहे.
मुख्य निवडणूक अधिकारी तथा सरचिटणीस सुरेश घोरपडे यांच्या मार्गदर्शनाखाली ११ ते १३ जून २०२६ या कालावधीत मतदान प्रक्रिया पार पडली, तर १५ जून रोजी मतमोजणी पूर्ण करण्यात आली. संपूर्ण निवडणूक प्रक्रिया शांततापूर्ण, पारदर्शक आणि शिस्तबद्ध वातावरणात पार पडल्याने सदस्यांनी समाधान व्यक्त केले.
शताब्दी वर्षाच्या उंबरठ्यावर झालेल्या या निवडणुकीमुळे महाराष्ट्र चेंबरच्या लोकशाही मूल्यांना नवसंजीवनी मिळाली असून नव्याने निवडून आलेल्या पदाधिकाऱ्यांच्या नेतृत्वाखाली व्यापार, उद्योग आणि कृषी क्षेत्राच्या विकासासाठी संस्था अधिक व्यापक आणि प्रभावी भूमिका बजावेल, असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *