ठाणे- मुंबईकरांना वाहतुकीची अत्यावश्यक सेवा पुरविणाऱ्या सार्वजनिक बेस्ट उपक्रमाच्या आजी, माजी व वेटलीज कामगारांनी केवळ आपल्या आर्थिक मागण्यांसाठीच नव्हे तर अत्यावश्यक सार्वजनिक बेस्ट सेवेचे अस्तित्व टिकविण्यासाठी, बेस्टच्या मालकीच्या बसेसचा ताफा वाढवून व वाहतूक सेवेचा आवाका वाढवून सार्वजनिक बेस्ट सेवा अधिक बळकट करण्यासाठी, बेस्टच्या मालमत्तेच्या विक्रीला विरोध दर्शवित बेस्टच्या खाजगीकरणाला तीव्र विरोध जाहीर करून १०० टक्के यशस्वी संप सुरू केला आहे.
आपल्या आर्थिक मागण्यांसोबत मुंबईकरांना परवडणारी, आरामदायी व सुरक्षित सार्वजनिक वाहतूक सेवा देखील मिळावी हा संपकरी बेस्ट कामगारांचा दृष्टिकोन उघड दिसत आहे. सेंटर ऑफ इंडियन ट्रेड युनियन्स (सीआयटीयू) ही अखिल भारतीय कामगार संघटना या संपाला जाहीर पाठिंबा दर्शवित असून राज्य शासन व महापालिकेच्या प्रशासनाला संपकरी कामगारांच्या मागण्यांची सोडवणूक दडपशाही न करता वाटाघाटीद्वारे करण्याचे आवाहन सिटूचे अध्यक्ष के. नारायणन, उपाध्यक्ष डॉ. विवेक मॉन्टेरो, सरचिटणीस शैलेन्द्र चौहान यांनी केले आहे.
