०००००००
ठाणे : आदिवासी कुटुंबांच्या प्रलंबित प्रश्नांना गती देण्यासाठी अंबरनाथ तहसीलदार कार्यालयात श्रमजीवी संघटनेच्या वतीने विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले. या बैठकीत तहसीलदार अमित पुरी आणि विविध विभागांच्या अधिकाऱ्यांनी आदिवासी बांधवांसोबत जमिनीवर बसून सुमारे तीन तास थेट संवाद साधत त्यांच्या समस्या जाणून घेतल्या.
जिल्हाधिकारी डॉ. श्रीकृष्ण पांचाळ यांच्या संकल्पनेतून आणि उपविभागीय अधिकारी विजयानंद शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली झालेल्या या बैठकीत पाणीटंचाई, जातीचे दाखले, रेशन आणि शासकीय योजनांशी संबंधित प्रश्नांवर चर्चा झाली. आदिवासी पाड्यांवरील पाणीटंचाईची दखल घेत तहसीलदार अमित पुरी यांनी सात दिवसांत प्रत्येक पाड्यावर पिण्याच्या पाण्याच्या टाक्या उभारण्याचे निर्देश दिले. तसेच कातकरी कुटुंबांना जातीचे दाखले व जन्म-मृत्यू प्रमाणपत्रे मिळावीत यासाठी १,००० अर्ज उपलब्ध करून देण्यात आले.
प्रश्नांचा सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी दरमहा आढावा बैठक घेण्याचा निर्णय यावेळी घेण्यात आला. जुलैच्या पहिल्या आठवड्यात ओळखपत्रांपासून वंचित आदिवासी कुटुंबांसाठी विशेष मोहीम राबविण्यात येणार असून विद्यार्थ्यांसाठी स्पर्धा परीक्षा अभ्यास केंद्रे सुरू करण्याचाही निर्णय घेण्यात आला.
या बैठकीला श्रमजीवी संघटनेचे पदाधिकारी, कार्यकर्ते आणि मोठ्या संख्येने आदिवासी बांधव उपस्थित होते. प्रशासनाने संवेदनशीलतेने घेतलेल्या या पुढाकारामुळे आदिवासींच्या प्रलंबित प्रश्नांना गती मिळेल, असा विश्वास संघटनेचे ठाणे जिल्हा सरचिटणीस राजेश चन्ने यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *