ठाणे- काँग्रेस नेते तथा लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांच्या ५६ व्या वाढदिवसानिमित्त औपचारिक कार्यक्रम न करता विविध सामाजिक, शैक्षणिक आणि जनहिताच्या उपक्रमांचे आयोजन करून समाजाभिमुख राजकारणाचा संदेश देण्यात आला. शिक्षण, आरोग्य आणि पर्यावरण या तीन महत्त्वाच्या विषयांना केंद्रस्थानी ठेवत काँग्रेस पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांनी नागरिकांशी थेट संवाद साधण्याचा प्रयत्न केला.
यावेळी कोर्ट नाका येथील पोलीस मुख्यालय प्राथमिक शाळेतील आर्थिकदृष्ट्या दुर्बल विद्यार्थ्यांना शालेय वह्या, शैक्षणिक साहित्य आणि खाऊचे वाटप करण्यात आले. शिक्षण हाच सामाजिक परिवर्तनाचा पाया असल्याची भूमिका मांडत विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक गरजांना हातभार लावण्याचा प्रयत्न करण्यात आला. पर्यावरण संवर्धनाचा संदेश देण्यासाठी कोपरी येथील स्वामी समर्थ मठ परिसरात वृक्षारोपण करण्यात आले. वाढते प्रदूषण, घटती हिरवाई आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक नागरिकाने वृक्षसंवर्धनाची जबाबदारी स्वीकारावी, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
ठाण्यातील मुख्य काँग्रेस कार्यालयात शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत वाढदिवस साजरा करण्यात आला. विशेष म्हणजे केक कापण्याचा मान गरीब मुलांना देत सामाजिक समतेचा संदेश देण्यात आला. त्यानंतर उपस्थितांना लाडूंचे वाटप करण्यात आले असल्याची माहिती ठाणे काँग्रेस जिल्हा अध्यक्ष राहुल पिंगळे यांनी दिली.
या कार्यक्रमातील आणखी एक महत्त्वाचा उपक्रम म्हणजे ‘ठाणे काँग्रेस वैद्यकीय मदत कक्ष’ या उपक्रमाच्या लोगोचे अनावरण. आर्थिक अडचणींमुळे उपचारांसाठी धावपळ करणाऱ्या गरजू रुग्णांना शासकीय योजनांची माहिती, वैद्यकीय मार्गदर्शन आणि आवश्यक ते सहकार्य उपलब्ध करून देण्याच्या उद्देशाने हा मदत कक्ष सुरू करण्यात आल्याचे पिंगळे यांनी सांगितले.
सामाजिक बांधिलकी जपत जनतेच्या प्रश्नांशी नाळ जोडणारे राजकारण करण्याची काँग्रेसची परंपरा असून, वाढदिवसाचे औचित्य साधून राबविण्यात आलेले हे उपक्रम त्याच विचारांची प्रचिती देणारे असल्याची भावना कार्यकर्त्यांनी व्यक्त केली.
या कार्यक्रमास प्रदेश सदस्य भालचंद्र महाडिक, नाना कदम, सेवादल अध्यक्ष रवींद्र कोळी, सरचिटणीस महेंद्र म्हात्रे, डॉ. जयेश परमार, अॅड. जावेद शेख, प्रसाद पाटील, स्वप्निल कोळी, अॅड. उमेश सिंग,राजेश मिश्रा,शिरीष घरत, चंद्रकांत पाटील, गोपाळ सावंत, समीर शेख, मुन्ना राजोरिया, प्रवीण खैरालिया, हर्षल कोळी, मनोज दुबे, नुर्शिद शेख, लोकेश घोलप, अंकुश चिंडालिया, विजय खेडेकर, प्रमोद यादव, हमीद शेख, विश्वास भगत यांच्यासह अनेक पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
०००००००००
