विकासाच्या नावाखाली भाजपाने मुंबई ‘बकाल’ केली – वर्षा गायकवाड*
बीएमसीत ३० वर्ष सत्तेत राहून मलई खाणाऱ्या भाजपाने अक्कल शिकवू नये; रस्त्यावर उतरून भाजपा नेत्यांनी काय ‘दिवे’ लावले ?
मुंबई : बृहन्मुंबई महानगरपालिकेत भारतीय जनता पक्ष मागील ३० वर्षांपासून सत्तेत आहे, यात २५ वर्षे शिवसेनेसोबतची युती आणि ज्या काळात निवडणुका झाल्या नाहीत त्या काळात प्रशासकांमार्फतही भाजपाची सत्ता होती आणि आत्ताही बीएमसीमध्ये भाजपाचीच सत्ता आहे तरीही, मुंबईच्या दुर्दशेला आपण जबाबदार नाही असे भासवून जबाबदारी झटकण्याचे काम भाजपा करत आहे, परंतु मुंबईला लुटून स्वतःचे खिसे भरणाऱ्या भाजपाला जबाबदारीपासून पळ काढता येणार नाही. मुंबईची वाताहत होण्यास भाजपाच जबाबदार आहे, असा हल्लाबोल मुंबई काँग्रेस अध्यक्ष वर्षा गायकवाड यांनी केला आहे.
भाजपाचा सडकून समाचार घेत खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या की, मुंबई महानगरपालिका नालेसफाईवर दवर्षी १०० कोटी रुपयापेक्षा जास्त खर्च करते, इतर खर्च वेगळाच करत असूनही एक दोन पावसातच मुंबई जलमय होते, मोठ मोठे वृक्ष कोलमडून जिवीत व वित्त हानी होते, रस्ते खचतात, सोसायट्यांमध्ये पाणी शिरले, वाहतूक कोंडी होती. महापालिका प्रशासन व सत्ताधारी पक्षाचे नेते १०० टक्के कामे झाल्याचा दावा करतात पण मुंबईची अवस्था काही बदलत नाही. मुंबईकरांना दरवर्षी प्रचंड त्रास सहन करावा लागतो. महापौर स्वतःचे ‘रील्स’ बनवण्यात अधिक मग्न असल्याचे दिसत आहे, तर आयुक्तांनीही काहीही उल्लेखनीय काम केलेले नाही. गेल्या काही दिवसांत घडलेल्या दुर्दैवी घटनांची भाजप केवळ थट्टाच करत आहे.
भाजपाचे काही बोलभांड नेते आम्ही रस्त्यावर उतरून काम करतो, विरोधक फक्त टिका करतात अशी गरळ ओकत आहेत. पण रस्त्यावर उतरून भाजपा नेत्यांनी काय ‘दिवे’ लावले? भाजपाची कृती ही वरातीमागून घोडे अशी आहे. दिल्लीपासून गल्लीपर्यंत भाजपाची सत्ता आहे, मग कोट्यवधी रुपये खर्चून कोणाचा विकास केला? सत्ताधारी पक्षाच्या चुका दाखवून देणे विरोधकांचे कामच आहे, त्यावर आगपाखड करण्याची गरज काय? भाजपा विरोधी पक्षात असताना काय करत होते? प्रत्येक कामाचे श्रेय घेण्यासाठी पुढे येता, मग जबाबदारी का नको? हिंदू मुस्लीम व बांग्लादेशीचा मुद्दा पुढे करून फक्त सामाजिक द्वेष पसरवण्यात भाजपाला स्वारस्य आहे, मुंबईकर मेला तरी भाजपाला काहीही वाटत नाही. भाजपाने मुंबई शहर बकाल केले व वरून तेच आरडाओरड करत आहेत. काम करा आणि स्वच्छ व सुरक्षित मुंबई करा, नाहीतर खूर्ची खाली करा, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या..
प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालून टेस्टिंग कसले करता?
मुंबई-पुणे द्रुतगती मार्गावर १३ किमीच्या मिसिंग लिंक प्रकल्पावर भाजपा महायुती सरकारने ७,१८० कोटी रुपये खर्च केला व १ मे रोजी त्याची मोठी प्रसिद्धी करत उद्घाटन केले पण पहिल्याच पावसाने या महामार्गाच्या कामाचे पितळ उघडे पाडले. महामार्गावर खड्डे पडले पण मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणतात, ही तर टेस्टिंग…कोट्यवधी रुपये खर्चून बांधलेल्या मिसिंग लिंकवर अवघ्या दोन महिन्यांत खड्डे पडतात…पण त्याची जबाबदारी स्वीकारण्याऐवजी मुख्यमंत्री रस्त्याची टेस्टिंग आहे म्हणत आहेत, हे अत्यंत हास्यास्पद आहे. प्रवाश्यांचा जीव धोक्यात घालून टेस्टिंग कसले करता आणि महामार्गावर टेस्टिंग होते तर या काळात टोल वसुली का थांबली नाही? करदात्यांच्या पैशातून उभारलेल्या महामार्गावर दोन महिन्यांत खड्डे पडत असतील, तर प्रश्न विचारणे हा नागरिकांचा अधिकार आहे. दुर्दैव म्हणजे, अपयश मान्य करण्याऐवजी सरकार टीका करणाऱ्यांनाच दोष देत आहे. जबाबदारापासून पळ काढणे हा भाजपा नेत्यांचा स्थायीभाव आहे, असेही खासदार वर्षा गायकवाड म्हणाल्या.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *