अयोध्या येथील श्रीराम मंदिरातील चोरीच्या निषेधार्थ
कल्याण : शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, कल्याण पूर्व शहर शाखेच्या वतीने कोळशेवाडी, कल्याण पूर्व येथील गणपती मंदिरात प्रभू श्रीरामचंद्रांच्या प्रतिमेसमोर श्रीराम रक्षा स्तोत्र पठण व महाआरतीचे आयोजन करण्यात आले. अयोध्या येथील श्रीराम मंदिरात झालेल्या चोरीच्या निषेधार्थ हा धार्मिक व निषेधात्मक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.
यावेळी मोठ्या संख्येने शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. उपस्थितांनी प्रभू श्रीराम यांच्या श्रद्धास्थानी झालेल्या चोरीबद्दल तीव्र संताप व्यक्त करत चोरीस गेलेला पैसा तात्काळ परत मिळवून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी केली. तसेच सरकारने याबाबत तातडीने ठोस पावले उचलली नाहीत, तर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाच्या वतीने रस्त्यावर उतरून तीव्र आंदोलन छेडण्यात येईल, असा इशारा देण्यात आला.
यावेळी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपजिल्हाप्रमुख नारायण पाटील, शहरप्रमुख हेमंत चौधरी, युवासेना शहर अधिकारी ॲड. नीरज कुमार, विधानसभा सह क्षेत्रप्रमुख पुरुषोत्तम चव्हाण, उत्तर भारतीय विभागाचे जिल्हा संघटक सदानंद तिवारी, महिला शहर संघटिका मिना माळवे तसेच शिवसैनिक, युवासैनिक, महिला आघाडीच्या पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.
