महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना राज्याध्यक्ष सुधीर घागस यांची मागणी
कल्याण : जनगणना-२०२७ च्या प्रथम टप्प्यात १ मे ते १५ जून या अधिकृत उन्हाळी सुट्टीच्या कालावधीत जनगणना कार्य करणाऱ्या राज्यातील शिक्षकांना तात्काळ मानधन अदा करावे तसेच नियमानुसार बदली रजा मंजूर करावी, अशी मागणी महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी जनगणना संचालनालय, महाराष्ट्र राज्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.
निवेदनात म्हटले आहे की, हजारो शिक्षकांनी स्वतःच्या वैधानिक उन्हाळी सुट्टीचा त्याग करून घरसूचीकरण, क्षेत्रीय पडताळणी, माहिती संकलन, पर्यवेक्षण तसेच जनगणना विभागाने सोपविलेली विविध कामे अत्यंत जबाबदारीने पूर्ण केली. त्यांच्या योगदानामुळे जनगणना-२०२७ च्या प्रथम टप्प्याचे काम यशस्वीपणे पूर्ण होण्यास मोठी मदत झाली. भारताचे महापंजीयक व जनगणना आयुक्त यांनी २५ जूनला सर्व राज्यांना जनगणना क्षेत्रीय कर्मचाऱ्यांचे मानधन कोणत्याही विलंबा शिवाय अदा करण्याचे निर्देश दिले असल्याचेही निवेदनात नमूद करण्यात आले आहे.
तसेच, महाराष्ट्र शासनाच्या २९ ऑक्टोबर २०१० च्या परिपत्रकानुसार उन्हाळी सुट्टीत जनगणना कार्य करणाऱ्या शिक्षकांना बदली रजा देण्याची स्पष्ट तरतूद असून, संबंधित शैक्षणिक वर्षात ती घेणे शक्य नसल्यास अर्जित रजा खात्यात जमा करण्याची व्यवस्था असल्याचे घागस यांनी निदर्शनास आणून दिले आहे. त्यामुळे जनगणना-२०२७ मध्ये उन्हाळी सुट्टीत प्रत्यक्ष कार्य केलेल्या सर्व शिक्षकांना मंजूर मानधन तात्काळ अदा करावे, कोणताही पात्र शिक्षक लाभापासून वंचित राहणार नाही याची खात्री करावी तसेच सर्व पात्र शिक्षकांना नियमानुसार बदली रजा मंजूर करण्याचे आदेश तातडीने निर्गमित करावेत, अशी मागणी करण्यात आली आहे.
“जनगणना हे राष्ट्रहिताचे अत्यंत महत्त्वाचे कार्य असून शिक्षकांनी नेहमीच शासनाला पूर्ण सहकार्य केले आहे. त्यामुळे त्यांच्या योगदानाचा योग्य सन्मान राखत शासनाने न्याय्य व सकारात्मक निर्णय घ्यावा,” असेही राज्याध्यक्ष सुधीर घागस यांनी निवेदनात म्हटले आहे. तर “शिक्षकांनी राष्ट्रहितासाठी स्वतःच्या उन्हाळी सुट्टीचा त्याग करून जनगणना-२०२७ चे कार्य निःस्वार्थपणे पूर्ण केले आहे. त्यांच्या श्रमांचा सन्मान म्हणून मानधन आणि बदली रजा देणे ही केवळ प्रशासकीय जबाबदारी नसून नैतिक बांधिलकीही आहे. शासनाने याबाबत तातडीने न्याय्य निर्णय घ्यावा.” अशी प्रतिक्रिया महाराष्ट्र राज्य शिक्षण क्रांती संघटना कल्याण-डोंबिवली महानगर जिल्हा कार्यवाह थॉमस शिनगारे यांनी दिली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *