कल्याण : मागील दोन दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे कल्याण डोंबिवली परिसरातील खंडित झालेल्या सुमारे ६ हजार वीज ग्राहकांचा वीज पुरवठा भर पावसात महावितरण कडून सुरळीत करण्यात आला आहे. महावितरण कडून देण्यात आलेल्या माहितीनुसार, काका धाबा परिसर, आरवली, ढोकळी, तिसवली, नांदीवली, हाजी मलंग परिसरात मुसळधार पावसामुळे खोल भागात पाणी जमा झाल्याने भूमीगत वीज वाहिन्यांना इजा होऊन अपघात होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून वीज पुरवठा  तात्पुरता बंद करण्यात आला होता.
वरील परिसरात एकुण १८ वीज रोहित्रांना मुसळधार पावसाचा फटका बसला. परिणामी सहा हजार वीज ग्राहक अंधारात होते. पुराचे पाणी ओसरल्यावर पण पाऊस सुरू असताना टप्याटप्याने खंडीत झालेला वीज पुरवठा रविवारी सायंकाळी सुरू करण्यात आला.
सखोल भागात पाणी जमा झाल्यास खबरदारीचा उपाय म्हणून महावितरण कडून तात्पुरता वीज पुरवठा बंद करण्यात येतो. पुराचे पाणी ओसरल्यावर वीज यंत्रणेची तपासणी करून नंतर वीज पुरवठा पूर्ववत करण्यात येतो. यंदा उन्हाळ्यात अती तापमानामुळे वीज वाहिन्यावर ताण वाढला. अचानक अतीवृष्टीमुळे भूमीगत वीज वाहिनीत बिघाड झाला असे महावितरण कडून स्पष्ट करण्यात आले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *