केडीएमसी डॉक्टर मारहाण प्रकरणी रोहित पवार यांनी दिली शास्त्रीनगर रुग्णालयाला भेट
कल्याण : डॉक्टरांना मारहाण करणारा नगरसेवक रमेश म्हात्रेची धिंड काढा, संध्याकाळ पर्यंत रमेश म्हात्रेला अटक न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी दिला. केडीएमसीच्या डॉक्टर आणि आरोग्य कर्मचाऱ्यांना शिवसेना नगरसेवक रमेश म्हात्रे यांनी बेदम मारहाण केल्यानंतर याचे तीव्र पडसाद उमटले असून या घटनेची महिती घेण्यासाठी आमदार रोहीत पवार डोंबिवलीच्या शास्त्रीनगर रुग्णालयात आले होते यावेळी ते पत्रकारांशी बोलत होते.
यावेळी बोलतांना रोहित पवार यांनी इथे कुठला आरोग्यमंत्री राज्यमंत्री आला का? श्रीकांत शिंदे आलेत का? रवींद्र चव्हाण भाजप प्रदेशाध्यक्ष इकडचे आमदार आहेत. चौथ्यांदा निवडून आले असे असतांना ते तरी आलेत का पाठबळ देण्यासाठी असा सवाल रोहित पवार यांनी उपस्थित केला. इलेक्शन आलं की एकमेकांच्या विरोधात खेळी करतात आणि सामान्य लोकांच्या जीवनाचा खेळ झाला तर येत नाहीत. असं असेल तर रवींद्र चव्हाण यांना पाचव्यांदा निवडून नाही दिले पाहिजे. खासदार श्रीकांत शिंदे यांनी ट्विट केलं मात्र त्यांनी इथे येऊन डॉक्टर नर्सेस यांना पाठबळ द्यायला पाहिजे होतं., असे मत रोहित पवार यांनी व्यक्त केले.
शास्त्रीनगर रुग्णालयातील मारहाण झालेल्या डॉक्टर आणि परिचारिकांना रोहित पवार यांनी भेटून त्यांची विचारपूस केली आणि धीर दिला. शिवसेना शिंदे गटाच्या नगरसेवकाने या देवदूतांना केलेली मारहाण ही सत्तेची मस्ती आणि गुंडगिरी असून याविरोधात सरकारला कठोर कारवाई करावीच लागेल असा इशारा त्यांनी दिला. यावेळी माजी खासदार विनायक राऊत, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रवक्ते महेश तपासे, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाध्यक्ष वंडार पाटील यांच्यासह इंडियन मेडिकल असोसिएशनचे पदाधिकारी, काँग्रेस व शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.
