सुरुवातीची लक्षणे ओळखा, वेळेत उपचार घ्या – वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या तज्ज्ञांचा इशारा
मिरा -भाईंदर :
शहरात सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे अनेक भागांमध्ये पाणी साचले असून नागरिकांना लेप्टोस्पायरोसिससह विविध जलजन्य आजारांचा धोका वाढला आहे. गटारे तुंबणे, रस्त्यांवर साचलेले दूषित पाणी आणि उंदरांसह इतर प्राण्यांच्या मूत्राने दूषित झालेल्या पाण्याच्या संपर्कात आल्यामुळे लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी विशेष काळजी घेण्याचे आवाहन आरोग्य तज्ज्ञांनी केले आहे.
वोक्हार्ट हॉस्पिटल्स,, मीरा रोड येथील हेड कन्सल्टंट – क्रिटिकल केअर, डॉ. अकलेश तांडेकर म्हणाले, “मुंबईसह मीरा-भाईंदर, वसई, विरार आणि नालासोपारा परिसरात पावसामुळे अनेक ठिकाणी पाणी साचते. अशा दूषित पाण्यातून चालताना त्वचेवरील जखम, खरचटलेली जागा किंवा डोळे, नाक आणि तोंडाद्वारे लेप्टोस्पायरोसिसचा संसर्ग होऊ शकतो. सुरुवातीला ताप, अंगदुखी, डोकेदुखी, थंडी वाजणे, उलट्या आणि अशक्तपणा अशी लक्षणे दिसतात. अनेकजण हा साधा व्हायरल ताप समजून दुर्लक्ष करतात. मात्र वेळेत उपचार न झाल्यास हा आजार किडनी, यकृत आणि फुफ्फुसांवर गंभीर परिणाम करू शकतो. काही रुग्णांना अतिदक्षता विभागात (ICU) उपचारांची गरज भासू शकते.”
ते पुढे म्हणाले, “पूराचे किंवा साचलेल्या पाण्याच्या संपर्कात आल्यानंतर पुढील दोन ते तीन आठवड्यांत ताप किंवा इतर लक्षणे दिसल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्यावा. लवकर निदान आणि योग्य अँटिबायोटिक उपचारांमुळे गंभीर गुंतागुंत टाळता येते.”
ताप किंवा इतर लक्षणे आढळल्यास स्वतः औषधे न घेता त्वरित डॉक्टरांचा सल्ला घ्या. वोक्हार्ट हॉस्पिटल्सच्या आरोग्य तज्ज्ञांच्या मते, जनजागृती, सुरुवातीची लक्षणे वेळेत ओळखणे आणि त्वरित वैद्यकीय उपचार घेणे हेच लेप्टोस्पायरोसिससारख्या गंभीर आजारापासून बचावाचे सर्वात प्रभावी उपाय आहेत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *