सुदैवाने जीवितहानी टळली; कुटुंब बेघर, प्रशासनाकडून मदतीचे आश्वासन
कल्याण : गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पावसामुळे गुरुवारी कल्याण पूर्वेतील नेतिवली येथील टेकडीचा काही भाग अचानक खचला. टेकडीवरून कोसळलेल्या माती व दगडांच्या ढिगाऱ्याखाली उर्दू शाळेजवळील एक घर पूर्णपणे जमीनदोस्त झाले. सुदैवाने या दुर्घटनेत कोणतीही जीवितहानी झाली नाही. घरात राहणारे नदीम शेख आणि त्यांच्या कुटुंबीयांनी वेळेत बाहेर पडल्याने मोठा अनर्थ टळला.
टेकडीवरून मोठ्या प्रमाणात दगड आणि माती रस्त्यावर आल्याने काही काळ वाहतुकीवर परिणाम झाला. घटनेची माहिती मिळताच प्रशासन आणि आपत्कालीन पथक घटनास्थळी दाखल झाले. युद्धपातळीवर मलबा हटविण्याचे काम हाती घेण्यात आले. घटनेची माहिती मिळताच प्रभागाच्या सहाय्यक आयुक्त सविता हिले यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. सततच्या पावसामुळे टेकडीची माती पूर्णपणे भुसभुशीत झाल्याने ही दुर्घटना घडल्याचे त्यांनी सांगितले. तसेच शासनाच्या माध्यमातून बाधित कुटुंबाला सर्वतोपरी मदत करण्यात येईल, असे आश्वासन त्यांनी दिले.
यावेळी स्थानिक नगरसेविका स्नेहल मोरे आणि रेखा चौधरी यांनीही घटनास्थळी भेट देत बाधित कुटुंबाला तातडीने आर्थिक मदत व पर्यायी निवास व्यवस्था उपलब्ध करून देण्याची मागणी केडीएमसी प्रशासनाकडे केली. स्थानिक नागरिकांच्या म्हणण्यानुसार, पावसाळ्यात या टेकडीवरून दरवर्षी दगड व माती कोसळण्याच्या घटना घडतात. अनेक वर्षांपासून ही समस्या कायम असूनही कायमस्वरूपी उपाययोजना करण्यात आलेली नाही. त्यामुळे टेकडीच्या परिसरात राहणारे हजारो नागरिक दर पावसाळ्यात भीतीच्या छायेत जीवन जगत आहेत.
000000000
