ठाणे : मुसळधार पावसादरम्यान आरटीओ परिसरात झाड कोसळून धर्मवीर नगर येथील रहिवासी स्व. पांडुरंग भुवड यांचा दुर्दैवी मृत्यू झाला होता. या पार्श्वभूमीवर शिवसेना नगरसेवक विकास रेपाळे व नगरसेविका नम्रता भोसले-जाधव यांच्या वतीने स्व. भुवड यांच्या कुटुंबीयांना ₹५ लाखांची आर्थिक मदत देण्यात आली. तसेच, जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सातत्याने पाठपुरावा करून शासनाकडून मंजूर झालेली ₹४ लाखांची तातडीची आर्थिक मदतही त्यांच्या कुटुंबीयांना सुपूर्द करण्यात आली.
याशिवाय, ठाणे महानगरपालिकेच्या वतीने स्व. भुवड यांच्या कुटुंबाला ₹१० लाखांची आर्थिक मदत मंजूर करण्याचा तसेच कुटुंबातील एका पात्र सदस्याला महापालिकेत नोकरी देण्याचा प्रस्ताव महासभेपुढे सादर करण्यात आला आहे. या प्रस्तावाला येत्या महासभेत तातडीने मान्यता मिळेल, अशी माहिती यावेळी देण्यात आली. या प्रसंगी स्व. पांडुरंग भुवड यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन करत त्यांना भविष्यातही आवश्यक ती सर्वतोपरी मदत करण्याची ग्वाही देण्यात आली. उपायुक्त मधुकर बोडके यांनी देखील एक महिन्याचा पगार या कुटुंबाला दिला आहे.
