आठवडाभरात दुसऱ्यांदा हाइट बॅरिकेट्स तुटले,
वाहतूक कोंडीमुळे नागरिकांचा संताप
कल्याण : कल्याणमधील वालधुनी उड्डाणपुलावर प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. अवघ्या आठवडाभरात दुसऱ्यांदा पुलावरील हाइट बॅरिकेट्स भरधाव वाहनाच्या धडकेत तुटून पडल्याची घटना बुधवारी पहाटे सुमारे ५.३० वाजण्याच्या सुमारास घडली. सुदैवाने त्या वेळी वाहतूक कमी असल्याने मोठी जीवितहानी टळली.
मिळालेल्या माहितीनुसार, भरधाव टेम्पोने पुलावरील हाइट बॅरिकेट्सना जोरदार धडक दिली. धडकेमुळे बॅरिकेट्स तुटून थेट रस्त्यावर कोसळले. यापूर्वीही १० जुलै रोजी याच ठिकाणी अशीच घटना घडली होती. मात्र, त्या घटनेनंतरही प्रशासनाने कोणतीही ठोस उपाययोजना न केल्याने पुन्हा अपघात घडल्याचा आरोप नागरिकांकडून करण्यात येत आहे. वालधुनी उड्डाणपुलावर अवजड वाहनांना प्रवेशबंदी असतानाही मोठी वाहने सर्रास येत असल्याचे चित्र आहे. त्यामुळे वाहतूक पोलिसांच्या कार्यक्षमतेवरही प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहे. वारंवार होणाऱ्या या घटनांमुळे स्थानिक नागरिकांमध्ये तीव्र नाराजीचे वातावरण आहे.
स्थानिक जागरूक नागरिक रोहित डोळस यांनी प्रशासनावर टीका करताना सांगितले की, “अवजड वाहनांना बंदी असतानाही ती पुलावर येतातच कशी? वाहतूक पोलिसांचा वचक का नाही? एकाच आठवड्यात दोनदा बॅरिकेट्स तुटणे हा प्रशासकीय निष्काळजीपणाचा कळस आहे. प्रशासन नेमके कोणाच्या बळीची वाट पाहत आहे?” यावेळी त्यांनी प्रशासनाकडे काही महत्त्वाच्या मागण्याही केल्या आहेत. पुलावर केवळ नावापुरते बॅरिकेट्स न बसवता मजबूत हाइट-रिस्ट्रिक्शन स्ट्रक्चर उभारण्यात यावे, संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बसवावेत, रात्रीच्या वेळी वाहतूक पोलिसांची नियमित गस्त ठेवावी आणि अवजड वाहनांवर कठोर कारवाई करावी, अशी मागणी त्यांनी केली.
दरम्यान, वारंवार घडणाऱ्या अशा घटनांमुळे वालधुनी उड्डाणपुलावरील सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला असून, भविष्यात मोठी दुर्घटना टाळण्यासाठी प्रशासनाने तातडीने कायमस्वरूपी उपाययोजना कराव्यात, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून जोर धरत आहे.
