ठाणे : ठाणे महानगरपालिका क्षेत्रातील बांधकाम व पाडकामातून निर्माण होणाऱ्या (सी अँड डी) कचऱ्याचे निर्मितीपासून अधिकृत प्रक्रिया केंद्रापर्यंत प्रभावी, पारदर्शक आणि शास्त्रोक्त व्यवस्थापन करण्यासाठी विकसित करण्यात आलेल्या C&D Waste Management Portalचे उद्घाटन गुरुवारी महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते करण्यात आले.
मा. उच्च न्यायालयाच्या हवा प्रदूषणासंदर्भात सुओ मोटू जनहित याचिकेतील निर्देशांनुसार ठाणे महापालिकेने कौन्सिल ऑन एनर्जी, एन्व्हायर्नमेंट अँड वॉटर (CEEW) यांच्या सहकार्याने हे पोर्टल विकसित केले आहे. यावेळी नगरअभियंता प्रशांत सोनग्रा, सहायक संचालक (नगररचना) कुणाल मुळे, उपायुक्त मधुकर बोडके, प्रभारी मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत, पर्यावरण क्षेत्रातील तज्ज्ञ तसेच सीईईडब्ल्युचे प्रतिनिधी उपस्थित होते.
हे पोर्टल महाराष्ट्र शासनाच्या बिल्डिंग प्लॅन मॅनेजमेंट सिस्टिमशी संलग्न असून, बांधकाम परवानगी घेताना विकासकांना बांधकाम कचरा शुल्क भरणे, कचरा व्यवस्थापनाचा आराखडा सादर करणे तसेच निर्माण झालेल्या व प्रक्रिया केलेल्या कचऱ्याची ऑनलाइन नोंद करणे बंधनकारक राहणार आहे. त्यामुळे बांधकाम कचऱ्याची अनधिकृत विल्हेवाट रोखण्यास, धूळ व हवा प्रदूषण कमी करण्यास तसेच पावसाळ्यात नाल्यांमध्ये कचरा साचून पाणी तुंबणे आणि पूरस्थिती निर्माण होण्याच्या समस्या कमी करण्यास मदत होणार आहे.
या पोर्टलमुळे बांधकाम कचऱ्याचा संपूर्ण मागोवा घेणे, त्याचे शास्त्रोक्त व्यवस्थापन व पुनर्वापर शक्य होणार असून पर्यावरणपूरक आणि शाश्वत शहरी विकासाला चालना मिळणार आहे. ठाणे महापालिका आणि सीईईडब्ल्यु यांच्या संयुक्त प्रयत्नातून विकसित करण्यात आलेले हे दुसरे डिजिटल व्यासपीठ असून, यापूर्वी एअर क्वालिटी डिसीजन सपोर्ट सिस्टम (AQDSS) यशस्वीपणे कार्यान्वित करण्यात आले आहे. या दोन्ही प्रणालींच्या माध्यमातून शहरातील बांधकाम क्षेत्रातून होणारे हवा प्रदूषण कमी करण्यास आणि पर्यावरण संरक्षणाला बळ मिळेल, असा विश्वास प्रभारी मुख्य पर्यावरण अधिकारी विद्या सावंत यांनी व्यक्त केला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *