अनिल ठाणेकर | ठाणेकच्छी अस्मिता मंचच्या वतीने आयोजित ‘कच्छी पगडी कोणशिरे’ गौरव सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते विविध क्षेत्रांत उल्लेखनीय कार्य करणाऱ्या कच्छी समाजातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आला. यावेळी कच्छी समाजाशी असलेले आपले कौटुंबिक व जिव्हाळ्याचे नाते अधोरेखित करत ठाण्याच्या सर्वांगीण विकासासाठी शासन कटिबद्ध असल्याची ग्वाही शिंदे यांनी दिली.
समाजरत्नांचा गौरव करणारा हा उपक्रम सलग १९ वर्षांपासून सुरू असून, प्रत्येक वर्षी या कार्यक्रमाला आपण आवर्जून उपस्थित राहत असल्याचे शिंदे यांनी सांगितले. “घरातील कार्यक्रमाला जसे आपण कोणत्याही परिस्थितीत उपस्थित राहतो, त्याच भावनेतून मी दरवर्षी येथे येतो. अशा सन्मानामुळे समाजात चांगले कार्य करण्याची प्रेरणा मिळते आणि समाजाचा विकास घडतो,” असे ते म्हणाले.
यावेळी पुरस्कारासाठी निवड झालेल्या एका ४० वर्षीय तरुणाचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाल्याबद्दल त्यांनी शोक व्यक्त करून श्रद्धांजली वाहिली.
कार्यक्रमाचे प्रमुख संयोजक सुरेश गडा यांच्या समाजकार्याचे कौतुक करताना शिंदे म्हणाले, “धर्मवीर आनंद दिघे यांचे खरे आणि निष्ठावान शिवसैनिक जर कोणी असतील, तर ते सुरेश गडा आहेत.” तसेच आषाढी बीजनिमित्त कच्छी समाजाला नववर्षाच्या शुभेच्छा देत हा दिवस कच्छी समाजासाठी नववर्षाचा प्रारंभ असल्याचे त्यांनी सांगितले.
ठाण्यात सुरू असलेल्या विकासकामांचा आढावा घेताना शिंदे यांनी शहरात मेट्रो, अंतर्गत मेट्रो, कोस्टल रोड, डबल डेकर रस्ते आणि अन्य महत्त्वाकांक्षी प्रकल्प सुरू असल्याची माहिती दिली. अहमदाबाद–घोडबंदर मार्गावरील वाहतूक कोस्टल रोडमार्गे मुंबईकडे वळविण्यात येणार असल्याने ठाण्यातील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होईल, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
धर्मवीर आनंद दिघे यांच्या व्यापारी हिताच्या भूमिकेचा उल्लेख करत शिंदे म्हणाले की, ठाण्यात व्यापारी सुरक्षित असल्यामुळे उद्योग-व्यवसायाला चालना मिळत आहे. “व्यापारी सुरक्षित आणि आनंदी असेल, तरच व्यापार वाढतो. व्यापारी समाजाच्या सुरक्षिततेची आणि आवश्यक सुविधा उपलब्ध करून देण्याची जबाबदारी माझी आहे,” असे त्यांनी स्पष्ट केले.
“ठाणेकरांनी मला शाखाप्रमुखापासून मुख्यमंत्री आणि आता उपमुख्यमंत्री होईपर्यंत साथ दिली. त्यामुळे हे नाते केवळ राजकीय नसून कौटुंबिक आहे,” असे भावनिक उद्गारही त्यांनी काढले. साकेत येथील त्रिमंदिर परिसरात कॅन्सर रुग्णालय उभारण्याचे काम सुरू असल्याची माहिती देत महावीर हॉस्पिटलसह विविध संस्थांमार्फत आरोग्य क्षेत्रात सुरू असलेल्या कामांचाही त्यांनी उल्लेख केला.
यावेळी आमदार मुरजी पटेल, आमदार रवींद्र फाटक, महापौर शर्मिला पिंपळोलकर, शिवसेना गटनेते पवन कदम, विधानसभा प्रमुख हेमंत पवार, कच्छी अस्मिता मंचाचे अध्यक्ष सुरेश गडा, प्रवक्ते राहुल लोंढे, नगरसेविका परीशा सरनाईक तसेच शिवसेनेचे पदाधिकारी आणि कच्छी समाजबांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
समाजहितासाठी कच्छी समाजाने अशीच एकजुटीने कार्य करत राहावे, शासन त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे असल्याचे सांगत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपल्या भाषणाचा समारोप केला.
००००००००
