सिंधुदुर्गनगरी —जिल्ह्यातील बचत गट तयार करीत असलेल्या मलाचा दर्जा चांगला असेल आणि पॅकिंग चांगले असेल तरच आजच्या स्पर्धेच्या युगात बचत गटांचा टिकाव लागू शकेल.तेव्हा या दोन्ही बाबींवर भर देऊन वाटचाल करावी असे आवाहन रत्नागिरी-सिंधुदुर्गचे खासदार नारायण राणे यांनी केले. जिल्हा विकास समन्वय व सनियंत्रण समितीची बैठक राणे यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हा नियोजन समिती सभागृहात पार पडली त्यावेळी राणे बोलत होते. बैठकीला जिल्ह्याचे पालकमंत्री नितेश राणे, आमदार दीपक केसरकर, जिल्हाधिकारी तृप्ती धोडमिसे,जि. प. चे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र खेबूडकर आदी उपस्थित होते.
केंद्र सरकारची पंतप्रधान ग्रामसडक योजना आणि राज्य सरकारच्या ‘ मनरेगा ‘ योजनांचा आढावा घेतांना रस्त्यांच्या कामाच्या दर्जा बाबत राणे यांनी आक्षेप घेत रस्त्यांची कामे दर्जेदार झाली नाहीत आणि जनतेच्या तक्रारी आल्यास संबंधित अधिकाऱ्यांवर कारवाई करण्यात येईल. तसेच निकृष्ट कामे करणाऱ्या कंत्राटदारांना काळ्या यादीत टाकावे असे आदेश राणे यांनी दिले. या दोन्ही योजनांचा लाभ जिल्ह्यातील जास्तीत जास्त लोकांना मिळेल यादृष्टीने अधिकाऱ्यांनी प्रयत्न करावेत अशा सूचना राणे यांनी दिल्या. या दोन्ही योजनांच्या जिल्ह्यातील कामाबाबत आपण समाधानी नाही असे राणे यांनी स्पष्ट केले. राणे यांनी यावेळी जिल्ह्यातील नगरपरिषदा आणि नगरपंचायतींच्या कामांचा आढावा घेतला. जिल्ह्यातील घनकचरा व्यवस्थापन आणि प्लास्टिक मुक्ती संबंधी आढावा घेतांना राणे यांनी या कामाच्या प्रगतीबाबत नाराजी व्यक्त करत ही कामे अधिक व्यापक प्रमाणात आणि जोमाने हाती घ्यावीत असे आवाहनही केले. सध्या जिल्ह्यात कणकवली तालुक्यातील कलमठ आणि वेंगुर्ला तालुक्यातील परुळे या दोनच गावांमध्ये हे काम सुरु आहे अशी माहिती यावेळी स्वच्छता विभागातर्फे देण्यात आली.
०००००००००
