स्मार्ट मीटरमुळे बिल वाढल्याची तक्रार?

हरिभाऊ लाखे
नाशिक : राज्यात महावितरणकडून बसविल्या जाणाऱ्या स्मार्ट मीटरवरून मोठे वादळ उठले आहे. हे मीटर बसवल्यानंतर देयकांत वाढ झाली, बळजबरीने ते बसविले जात असल्याच्या तक्रारी होत आहेत. त्या विरोधात आंदोलने होत असून स्मार्ट मीटर काढून जुने मीटर बसविण्याचा आग्रह धरला जात आहे. स्मार्ट मीटरमुळे निर्माण झालेला संभ्रम आणि संशय दूर करण्यासाठी आता खुद्द महावितरणने पुढाकार घेतला आहे.
स्मार्ट मीटरविरोधात नाराजी वाढत असल्याने नाशिक मंडळातील २८, मालेगाव मंडळातील १५ आणि अहिल्यानगर मंडळातील २९ अशा महावितरणच्या एकूण ७२ उपविभागीय कार्यालयांमध्ये शनिवारी सकाळी ११ ते सायंकाळी ४ या वेळेत ग्राहक संवाद मेळावा पार पडणार आहे. मेळाव्यांना संबंधित महावितरणचे कार्यकारी अभियंते, अतिरिक्त कार्यकारी अभियंते, उपकार्यकारी अभियंते व अधिकारी उपस्थित राहून ग्राहकांच्या शंकांचे निरसन करतील. तसेच स्मार्ट मीटरसंदर्भात असलेल्या शंकांची व वीज देयकांबाबतच्या तक्रारींची तपासणी करून त्यांचे निराकरण करण्यात येणार आहे. यावेळी स्मार्ट मीटरचे फायदे, वैशिष्ट्ये, कार्यपद्धती आणि अचूकतेविषयी माहिती देण्यात येणार आहे. स्मार्ट मीटरच्या अचूकतेबाबत किंवा कुठल्याही कारणाने आलेल्या वाढीव वीज देयकांबाबतच्या तक्रारींचे महावितरणकडून प्राधान्याने निराकरण करण्यात येणार आहे.
परिमंडळात पावणे आठ लाख स्मार्ट (टीओडी) मीटर
नाशिक परिमंडळात आतापर्यंत एकूण ७ लाख ६५ हजार ७०९ सर्व वर्गवारीच्या वीज ग्राहकांकडे स्मार्ट (टीओडी) मीटर बसविण्यात आले आहेत. यामध्ये नाशिक मंडळात ३ लाख ३८ हजार ८५५, मालेगाव मंडळात १ लाख १५ हजार ३७३ आणि अहिल्यानगर मंडळात ३ लाख ११ हजार ४८१ मीटरचा समावेश आहे. स्मार्ट मीटरचे फायदे व माहिती जाणून घेतल्यानंतर नाशिक परिमंडळातील मोठ्या प्रमाणात वीज ग्राहकांनी स्वेच्छेने स्मार्ट मीटर बसविण्यासाठी प्रतिसाद दिल्याचा दावा महावितरणने केला आहे.
औद्योगिक ग्राहकांना साकडे?
स्मार्ट (टीओडी) मीटर हे पूर्णतः अचूक असून सामान्य वीज ग्राहकांसाठी फायदेशीर असल्याचे महावितरणने स्पष्ट केले आहे. दिवसा वीज वापरावर प्रति युनिट ८५ पैशांची सवलत मिळविण्यासाठी स्मार्ट टीओडी मीटर उपयुक्त ठरले आहेत. औद्योगिक ग्राहकांकडे अनेक वर्षांपासून अशा प्रकारचे मीटर वापरात असल्याने वीज ग्राहकांनी मेळाव्यांना उपस्थित राहून वस्तुस्थिती जाणून घ्यावी, असे आवाहन नाशिक परिमंडळाचे मुख्य अभियंता सुंदर लटपटे यांनी केले आहे.
000000000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *