ठाणे सिव्हिल रुग्णालयाची कौतुकास्पद कामगिरी
अनिल ठाणेकर
ठाणे : एखाद्या चिमुकलीच्या डोळ्यांत पुन्हा प्रकाश फुलणे, यापेक्षा मोठे समाधान डॉक्टरांसाठी दुसरे कोणते असू शकत नाही. जन्मापासूनच जग धूसर पाहणाऱ्या सात वर्षीय मुलीच्या आयुष्यात ठाणे जिल्हा शासकीय (सिव्हिल) रुग्णालयाने आशेचा नवा किरण आणला असून, यशस्वी शस्त्रक्रियेमुळे आता तिला दोन्ही डोळ्यांनी स्पष्ट दिसू लागले आहे.
मुरबाड येथील छोट्या मुलीला जन्मजात दोन्ही डोळ्यांना मोतीबिंदू होता. त्यामुळे तिचे बालपण इतर मुलांपेक्षा वेगळे ठरत होते. गेल्या वर्षी तिच्या एका डोळ्यावरील मोतीबिंदूची शस्त्रक्रिया यशस्वी झाली होती. त्यानंतर जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार आणि अतिरिक्त जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धीरज महांगडे यांच्या मार्गदर्शनाखाली दुसऱ्या डोळ्याचीही शस्त्रक्रिया यशस्वीरित्या करण्यात आली. या शस्त्रक्रियेत उच्च दर्जाच्या कृत्रिम लेन्स बसविण्यात आली असून या मुलीला आता दोन्ही डोळ्यांनी स्पष्ट दिसत असल्याची माहिती नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर यांनी दिली.
जन्मजात मोतीबिंदू असलेल्या लहान मुलावर शस्त्रक्रिया करणे हे वैद्यकीयदृष्ट्या मोठे आव्हान असते. मात्र ठाणे सिव्हिल रुग्णालयातील डॉक्टरांच्या कौशल्यामुळे मुलीच्या आयुष्यातील अंधार दूर झाला. सर्वसामान्य कुटुंबातील या चिमुकलीला नव्या दृष्टीसह उज्ज्वल भविष्याची आशा मिळाली आहे. या शस्त्रक्रियेसाठी नेत्ररोगतज्ज्ञ डॉ. शुभांगी अंबाडेकर, भूलतज्ज्ञ डॉ. प्रियांका महांगडे आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी विशेष परिश्रम घेतले.
चौकट
जन्मजात मोतीबिंदूचे वेळेत निदान आणि उपचार झाल्यास मुलांची दृष्टी वाचू शकते. लहान मुलाला नीट दिसत नसल्याचा संशय आल्यास, डोळ्यात पांढरेपणा दिसल्यास किंवा प्रकाशाकडे प्रतिसाद कमी असल्यास कोणताही विलंब न करता नेत्रतज्ज्ञांचा सल्ला घ्यावा.
– डॉ. कैलास पवार (जिल्हा शल्य चिकित्सक ठाणे)

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *