शहापूर प्रकल्प एकात्मिक आदिवासी विकास कार्यालयाचा पराक्रम
ठाणे : आदिवासी विकास विभाग आयुक्त कार्यालयाने ०४.११.२०२५ अन्वये, सन २०२५-२६ ते सन २०२९-३० या कालावधीत ठाणे जिल्हयातील शहापूर तालुक्यातील शेंडेगाव येथे आश्रम शाळांचे ‘सेंटर किचन’ (मध्यवर्ती स्वयंपाकगृह) सुरू करण्याचे आदेश दिले होते. आदेश प्राप्त होऊन जवळपास एक महिन्याचा कालावधी उलटून गेला तरी अद्यापही शहापूर प्रकल्प एकात्मिक आदिवासी विकास कार्यलय यांनी जाणीवपूर्वक दुर्लक्ष करून हे सेंटर किचन अद्याप सुरू केलेले दिसत नाही. आयुक्त यांच्या आदेशाचे अशा प्रकारे उल्लंघन करणे हे प्रशासकीय शिस्तीच्या आणि विद्यार्थ्यांच्या हिताच्या विरोधात असून आयुक्तस्तरावरून आदेश देऊनही शेंडेगाव येथे सेंटर किचन’ (मध्यवर्ती स्वयंपाकगृह) सुरू करण्यास जाणीवपूर्वक विलंब केला जात आहे. यामुळे विद्यार्थ्यांना दर्जेदार आणि वेळेवर मिळणाऱ्या आहारापासून वंचित राहावे लागत असून, प्रशासकीय दिरंगाईबद्दल पालक वर्गात तीव्र संताप व्यक्त होत आहे.आयुक्त कार्यालयाकडून स्पष्ट निर्देश देऊनही कंत्राटदारांच्या संगनमताने हे प्रकल्प रखडवले जात आहे की काय अशी चर्चा पालक वर्गात सुरु आहे.
सेंटर किचन सुरू झाल्यास धान्याची नासाडी थांबेल, गैरव्यवहाराला आळा बसेल आणि विद्यार्थ्यांना एकसमान व सकस आहार देणे शक्य होईल. या प्रक्रियेत कंत्राटदार अडथळे निर्माण करत असल्याचा दाट शक्यता असल्याचा संशय पालक वर्गात निर्माण झाला आहे. या विलंबामुळे विद्यार्थ्यांच्या आरोग्याशी आणि पोषण आहाराशी खेळ सुरू असून, तात्काळ शेंडेगाव येथे आयुक्त यांच्या आदेशाचे पालन करून सेंटर किचन’ (मध्यवर्ती स्वयंपाकगृह) सुरु करावे अशी मागणी रिपब्लिकन ए. फेडरेशनचे तालुका सरचिटणीस राजू लोखंडे यांनी केली आहे.
