रमेश औताडे
मुंबई : साहित्यिक लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांच्या जयंती दिनानिमित्त १ ऑगस्ट रोजी मुंबई महानगरपालिकेतर्फे उत्सवाचे आयोजन करण्यात येते. त्याच धरतीवर अशा प्रकारच्या उत्सवाच्या आयोजन नवी मुंबई महानगरपालिकेत तसेच मिरा भाईंदर महानगरपालिकेत व्हावे याकरिता आमदार अमित गोरखे सातत्याने प्रयत्नशील होते. यासंदर्भात राष्ट्रीय स्वाभिमानी मातंग संघटनेचे राजीव मानकर आणि प्रकाश चव्हाण यांनी सातत्याने पाठपुरावा करून नवी मुंबई महानगरपालिका तथा मीरा भाईंदर महानगरपालिका या दोन्ही महानगरपालिकेत या उत्सवाचे आयोजन करण्याकरिता महानगरपालिकेकडून प्रस्तावना मान्य करून घेतलेली आहे. त्यामुळे आता मुंबई आणि ठाणे महानगरपालिकेप्रमाणे नवी मुंबई महानगरपालिका तसेच मीरा-भाईंदर महानगरपालिका क्षेत्रातही जयंतीचे आयोजन करण्यात येणार आहे. मातंग समाजाने आमदार अमित गोरखे आणि राजीव मानकर यांचे आभार मानले आहेत.
