मिरा – भाईंदर : पँथर नेते ज. वि.पवार यांच्या वाढदिवसानिमित्त जविकिरण काव्य मैफल, मुंबई व स्वर संगम फाऊंडेशन, मीरा रोड यांच्या संयुक्त विद्यमाने येथील विरंगुळा केंद्रात आयोजित करण्यात आलेल्या जविकिरण काव्य मैफलीला कवी, रसिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. पँथर ज.वि.पवार यांच्या प्रत्यक्ष उपस्थित संपन्न झालेल्या या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी ज्येष्ठ गझलकार सुनील ओवाळ होते. या निमित्त झालेल्या सत्काराला उत्तर देताना ज. वि. पवार यांनी आयोजकांचे कौतुक केले. जविकिरण काव्य मैफलीने राबविलेल्या विविध उपक्रमांची प्रशंसा करून अशा साहित्यिक चळवळी अधिक व्यापक व्हाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.
जविकिरण काव्य मैफलचे प्रवर्तक व अपरान्त साहित्य कला प्रबोधिनीचे केंद्रीय कार्याध्यक्ष सद्धम्मकार प्रा.आनंद देवडेकर यांनी जविकिरण काव्य मैफलीच्या स्थापनेपासूनचा प्रवास, मैफलीची उद्दिष्टे, कवी म्हणून घडण्यासाठीचा जविकिरण मैफलीनं उपलब्ध करून दिलेला अवकाश याचा नवोदित साहित्यिकांनी कसा लाभ घ्यायचा आहे या संदर्भात मार्गदर्शन केले. ते करताना उदाहरणादाखल प्रा. देवडेकर यांनी स्वतःच्या दोन काव्यरचनाही सादर केल्या. विशेष उपस्थिती लाभलेले प्रा. डॉ. गणेश चंदनशिवे,विभागप्रमुख, लोककला अकादमी, मुंबई विद्यापीठ यांनी चवदार तळे या विषयावरील प्रभावी कविता सादर करून उपस्थित श्रोत्यांना मंत्रमुग्ध केले.
मैफलीत ज्येष्ठ हिंदी साहित्यिक हृदयेश मयंक, मुस्तहसन अज्म, सुधाकर सरवदे, विकास भंडारे, प्रा. प्रज्ञाकिरण वाघमारे आणि अद्विता तेज्वील पवार यांच्या कवितांना रसिकांनी भरभरून दाद दिली. या काव्य मैफलीत ठाणे, पालघर, मुंबई आणि नवी मुंबई जिल्ह्यांतील जवळपास ५० कवींनी आपल्या स्वरचित कविता सादर केल्या. विविध विषय, सामाजिक जाणीव, मानवी मूल्ये आणि समकालीन वास्तव यांचा वेध घेणाऱ्या कवितांमुळे संपूर्ण सभागृह काव्यमय वातावरणात रंगून गेले. जविकिरण काव्य मैफलीचे सचिव प्रा. उत्तम भगत यांनी सुमारे चार तास रंगलेल्या या काव्य मैफलीचे आपल्या नेहमीच्या खास शैलीत प्रभावी सूत्रसंचालन केले. मीरा-भाईंदर परिसरातील साहित्यप्रेमी, कवी आणि रसिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. जविंच्या वाढदिवसानिमित्त विविध संस्थांच्या वतीनं जविंचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. उपस्थितांनी कार्यक्रमाचे कौतुक करून अशा साहित्यिक उपक्रमांचे सातत्याने आयोजन व्हावे, अशी अपेक्षा व्यक्त केली.
00000000
