मान्यता रद्द करण्यासाठी उपसंचालकांना पत्र
कल्याण : टिटवाळा येथील केएनटी शाळा प्रशासनाकडून तिप्पट दराने ठराविक दुकानातुच गणवेश खरेदी करण्याची सक्ती पालकांवर केल्याने याविरोधात पालकांनी शिक्षण विभागावर तीन वेळा आंदोलन छेडले. मात्र, तरीही संबधित शाळा प्रशासनावर कोणतीही कारवाई होत नाही. यासाठी आज पुन्हा या पालकांनी केडीएमसीच्या शिक्षण मंडळ कार्यालयात ठिय्या मांडत आंदोलन केले. शिक्षण विभाग आणि शाळा प्रशासनाचे साटे लोटे असल्याचा आरोप सामाजिक कार्यकर्ते विजय देशेकर यांनी केला आहे. तर, शाळेकडून वाढीव दराने गणवेश विक्री केल्याच्या तक्रारीची दखल घेत याप्रकरणी शाळेविरोधात कारवाई करण्यासाठी उपसंचालकांना पत्र पाठवले असून, त्यांच्याकडून आदेश प्राप्त होताच कारवाई केली जाईल. असे केडीएमसी शिक्षण विभाग प्रशासन अधिकारी भारत बोरनारे यांनी स्पष्ट केले आहे.
के.एन.टी. पब्लिक स्कूल, टिटवाळा येथील पीडित व त्रस्त पालकांनी शाळेकडून करण्यात येत असलेल्या कथित सक्तीच्या गणवेश विक्री, शैक्षणिक साहित्याबाबतच्या तक्रारी आणि इतर मुद्द्यांसंदर्भात २५ जून रोजी प्रशासन अधिकारी तथा शिक्षणाधिकारी भारत बोरनारे यांची प्रत्यक्ष भेट घेऊन संबंधित कागदपत्रे व उपलब्ध पुरावे सादर केले होते. पालकांच्या म्हणण्यानुसार, त्या बैठकीत संबंधित प्रकार गंभीर असल्याचे निदर्शनास आले असून, पुढील आवश्यक कार्यवाही करण्यात येईल तसेच आवश्यक असल्यास संबंधित प्रस्ताव मा. शिक्षण उपसंचालक, मुंबई यांच्याकडे पाठविण्यात येईल, असे आश्वासन देण्यात आले होते. तसेच काही पालकांना संबंधित गणवेश विक्रेत्याकडे गणवेश परत जमा करण्याबाबत आणि शैक्षणिक साहित्याबाबत पुढील सूचनांची प्रतीक्षा करण्यास सांगण्यात आले होते.
त्यानंतरही कोणताही लेखी निर्णय, बैठक किंवा पालकांना दिलासा देणारी ठोस कार्यवाही न झाल्याने पालकांनी दिनांक २ जुलै २०२६ रोजी स्मरणपत्रही सादर केले. मात्र आजपर्यंत कोणताही अंतिम निर्णय अथवा स्पष्ट आदेश प्राप्त झालेला नसल्याचा पालकांचा दावा आहे. यामुळे अनेक पालकांनी गणवेश विक्रेत्याकडे परत जमा केले असले तरी त्यांना अद्याप पैसे परत मिळालेले नाहीत. तसेच शैक्षणिक साहित्याबाबतही निर्णय प्रलंबित असल्याने पालक आणि विद्यार्थी संभ्रमाच्या स्थितीत आहेत. या पार्श्वभूमीवर, प्रशासनाकडून तातडीने निर्णय व्हावा, विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान टाळावे आणि पालकांना न्याय मिळावा या मागण्यांसाठी आज शिक्षण मंडळ कार्यालय येथे पालकांनी निषेध आंदोलन केले.
00000000
