अवघ्या ४ तासांत उभारला १६० टनांचा भव्य गर्डर लाँचर
मुंबई : मुंबई–ठाणे दरम्यानचा प्रवास अधिक वेगवान करण्याच्या दिशेने आणखी एक महत्त्वाचा टप्पा गाठण्यात आला आहे. मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरण (एमएमआरडीए) ने १३.९ किमी लांबीच्या उन्नत पूर्व मुक्त मार्ग विस्तारीकरण प्रकल्पात (छेडानगर ते आनंद नगर) गजबजलेल्या पूर्व द्रुतगती महामार्गावर सेगमेंट लाँचरसाठी प्रत्येकी ५९ मीटर लांबीचे व १६० मेट्रिक टन वजनाचे मुख्य गर्डर लाँचरचे दोन भाग यशस्वीरित्या उभारले.
विशेष म्हणजे, अत्यंत जटिल मानली जाणारी ही प्रक्रिया पूर्ण करण्यासाठी साधारणपणे १८ ते २४ तासांचा कालावधी लागतो. मात्र, उत्कृष्ट नियोजन, आधुनिक तंत्रज्ञान आणि काटेकोर अंमलबजावणीच्या जोरावर हे काम अवघ्या ४ तासांत पूर्ण करण्यात आले. या यशामागे एमएमआरडीए आणि मुंबई वाहतूक पोलिस यांच्यातील प्रभावी समन्वय, काटेकोर सुरक्षा उपाययोजना आणि अचूक नियोजनाची महत्त्वाची भूमिका होती.
पुढे काय?
मुख्य गर्डर लाँचरची उभारणी पूर्ण झाल्यानंतर आता सेगमेंट लाँचरच्या साहाय्याने १,६३२ प्रीकास्ट सेगमेंट्स टप्प्याटप्प्याने बसविण्यात येणार आहेत. प्रत्येक सेगमेंटचे वजन सुमारे ९० मेट्रिक टन असून, त्याद्वारे २५ मीटर रुंदीच्या सिंगल-सेल सेगमेंट सुपर स्ट्रक्चरची उभारणी केली जाईल. त्यामुळे व्हायाडक्टच्या बांधकामाला मोठी गती मिळणार असून प्रकल्प पुढील निर्णायक टप्प्यात प्रवेश करणार आहे.
मुंबईकरांसाठी काय फायदा?
१३.९ किमी लांबीचा हा पूर्णपणे उन्नत सहा-पदरी हाय-स्पीड कॉरिडॉर आनंद नगर (ठाणे) ते छेडानगर (घाटकोपर) असा असणार आहे. हा मार्ग मुलुंड, ऐरोली, जेव्हीएलआर, विक्रोळी, कांजूरमार्ग आणि मानखुर्द या महत्त्वाच्या भागांना जोडणार आहे. हा प्रकल्प पूर्ण झाल्यानंतर पूर्व द्रुतगती महामार्गावरील वाहतूक कोंडी मोठ्या प्रमाणात कमी होण्यास मदत होईल. तसेच दक्षिण मुंबई ते ठाणे हा प्रवास अवघ्या २५ ते ३० मिनिटांत पूर्ण करणे शक्य होणार असून, मुंबई महानगर प्रदेशातील दळणवळण अधिक वेगवान, सुरक्षित आणि विश्वासार्ह होईल. अचूक नियोजन, अत्याधुनिक अभियांत्रिकी आणि वेळेचे प्रभावी व्यवस्थापन यामुळे अवघ्या चार तासांत पार पडलेला हा टप्पा मुंबईच्या पायाभूत सुविधांच्या विकासातील आणखी एक महत्त्वपूर्ण मैलाचा दगड ठरला आहे, असे अधिकाऱ्यांनी सांगितले.
