अन्न,नागरी पुरवठा, ग्राहक संरक्षण विभागाकडून शासन निर्णय जारी
मिरा भाईंदर : मिरा रोड परिसरातील नागरिकांना रेशनसंदर्भातील कामांसाठी होणारा त्रास कमी करण्याच्या दृष्टीने स्वतंत्र शिधावाटप कार्यालय सूरू करण्यात यावे अशी मागणी आमदार नरेंद्र मेहता यांनी १३ मार्च २०२५ मध्ये मुख्यमंत्री यांच्याकडे केली होती. त्यांच्या पाठपुराव्याला आता यश मिळाले असून एक वचनपूर्ती पूर्ण झाली आहे.राज्य शासनाने महत्त्वाचा निर्णय घेत शासन निर्णय जारी केला आहे. मिरा-भाईंदर शहरासाठी मिरा रोड येथे स्वतंत्र शिधावाटप (रेशन) कार्यालय सुरू करण्यास महाराष्ट्र शासनाने प्रशासकीय मान्यता दिली आहे. हा शासन निर्णय २१ जुलै २०२६ रोजी अन्न नागरि पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागाकडून जारी करण्यात आला आहे.
मिरा-भाईंदरमधील ३९ अधिकृत रेशन दुकाने आणि अतिरिक्त ३ दुकाने, अशी एकूण ४२ दुकाने नव्या मिरा रोड कार्यालयाच्या कार्यक्षेत्रात समाविष्ट करण्याचा निर्णय शासनाकडून घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे रेशन कार्डधारकांना किरकोळ दुरुस्ती, नाव समाविष्ट करणे, पत्ता बदल, तक्रारी तसेच इतर शिधावाटपाशी संबंधित कामांसाठी दूरवर जावे लागणार नाही. स्थानिक पातळीवरच सेवा उपलब्ध झाल्याने नागरिकांचा वेळ आणि खर्च दोन्हीची बचत होणार आहे. त्यामुळे शिधावाटप संबंधित नागरिकांना असणाऱ्या अडचणी दूर होणार असून एक प्रकारचा मोठा दिलासा मिळाला आहे.
मिरारोड येथे स्वतंत्र शिधावाटप कार्यालय सुरू करण्याचा निर्णय हा मिरा-भाईंदरमधील हजारो रेशन कार्डधारकांसाठी दिलासादायक ठरणार असून, शिधावाटप यंत्रणेची कार्यक्षमता वाढण्यासही मदत होणार आहे.नव्याने मंजूर करण्यात आलेल्या मीरारोड शिधावाटप कार्यालयामुळे नागरिकांना दिलासा मिळणार असल्याने आमदार नरेंद्र मेहता यांनी शासनाचे आभार व्यक्त केले आहे.
