मिरा-भाईंदर
जागतिक मेंदू दिनानिमित्त न्यूरोलॉजी तज्ज्ञांनी नागरिकांना मेंदूच्या आरोग्याला सर्वोच्च प्राधान्य देण्याचे आवाहन केले. त्यांच्या मते, भारतात ३ कोटींहून अधिक नागरिक न्यूरोलॉजिकल विकारांनी प्रभावित असून देशाच्या एकूण आजारांच्या भारापैकी सुमारे १० टक्के भार या आजारांचा आहे. वाढता ताण, वायू प्रदूषण, बदलती जीवनशैली, मधुमेह, उच्च रक्तदाब, लठ्ठपणा आणि वाढते वय यामुळे स्ट्रोक, एपिलेप्सी, मायग्रेन, पार्किन्सन्स, डिमेन्शिया यांसारख्या आजारांचे प्रमाण वाढत आहे.
वोक्हार्ट हॉस्पिटल्स, मीरा रोड येथील इंटरव्हेन्शनल न्यूरोलॉजिस्ट व स्ट्रोक तज्ज्ञ डॉ. पवन पै  यांनी सांगितले की, स्ट्रोकच्या उपचारात प्रत्येक मिनिट महत्त्वाचे असते. अचानक हात-पायात अशक्तपणा, बोलण्यात अडचण, तीव्र किंवा वेगळी डोकेदुखी, चक्कर येणे, स्मरणशक्ती कमी होणे किंवा दृष्टीत बदल ही मेंदूची गंभीर इशारे असू शकतात. याशिवाय, अल्झायमर, डिमेन्शिया, पार्किन्सन्स, मेंदूतील गाठी (ब्रेन ट्यूमर), मल्टिपल स्क्लेरोसिस आणि मज्जातंतूंचे विकार यांसारख्या आजारांचे प्रमाणही वाढत आहे. या आजारांची सुरुवात अनेकदा अत्यंत सौम्य लक्षणांनी होते. वारंवार डोकेदुखी, विस्मरण, हात-पायात मुंग्या येणे, चालताना तोल जाणे, हात थरथरणे, झटके येणे किंवा बोलण्यात अचानक अडथळा निर्माण होणे ही लक्षणे दुर्लक्षित करू नयेत.
जनजागृती, वेळेवर निदान, त्वरित उपचार आणि निरोगी जीवनशैली यामुळे लाखो नागरिकांना अपंगत्वापासून वाचवता येईल. योग्य वेळी निदान आणि तज्ज्ञांकडून उपचार सुरू केल्यास अनेक मेंदूविकारांवर प्रभावी नियंत्रण मिळवता येते आणि रुग्णाला दीर्घकाळ निरोगी व स्वावलंबी जीवन जगणे शक्य होते. यामुळे आरोग्यावरील खर्च कमी होईल, देशाची उत्पादकता वाढेल आणि भारत अधिक निरोगी व सक्षम राष्ट्र बनण्यास मदत होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *