मुख्यमंत्री फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त ‘पैलवान दत्तक योजने’चा शुभारंभ
मुंबई : महाराष्ट्राच्या मातीने देशाला असंख्य मल्ल दिले; मात्र गरिबीमुळे अनेक गुणी पैलवानांची स्वप्ने आखाड्याबाहेरच थांबली. हीच परंपरा मोडून काढण्याचा निर्धार करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडिया (यु डब्ल्यू एफ आय) आणि देवाभाऊ केसरी फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राबविण्यात येणाऱ्या ‘पैलवान दत्तक योजना २०२६–२७’ या महत्त्वाकांक्षी उपक्रमाचा राज्याचे आपत्ती व्यवस्थापन व जलसंपदा मंत्री गिरीश महाजन यांच्या हस्ते मंगळवारी मलबार हिल येथील सेवा सदन बंगल्यावर शुभारंभ करण्यात आला. या उपक्रमांतर्गत महाराष्ट्रातील ११ होतकरू पैलवानांना दत्तक घेत त्यांना शिष्यवृत्ती, मानधन आणि क्रीडा साहित्याचे वितरण करण्यात आले. महाराष्ट्राच्या कुस्तीला नवे बळ देणाऱ्या या उपक्रमामुळे आर्थिक अडचणींमुळे मागे पडणाऱ्या प्रतिभावान मल्लांच्या स्वप्नांना आता भक्कम आधार मिळणार आहे.
या ११ मल्लांवर विश्वासाची मोहोर
या योजनेत सोहम सुनील कुंभार, ज्ञानवी अर्जुन पाटील, संग्राम नितीन खुर्द, रणवीर समिंदर जाधव, श्रीकर भास्कर नायकवडी, वैष्णवी शंकर पाटील, वीरेन अरुण पाटील, हर्षल आनंद घाटके, विश्वजीत धर्मेंद्र सावंत, पियुष दादासो शेवाळे आणि व्यंकटेश चोरगे या ११ होतकरू पैलवानांची निवड करण्यात आली. आर्थिक आधारासह दर्जेदार प्रशिक्षणासाठी हा उपक्रम त्यांच्या कारकिर्दीतील महत्त्वाचा टप्पा ठरणार आहे.
५० पैलवान दत्तक घेण्याचा निर्धार
मार्गदर्शन करताना गिरीशभाऊ महाजन म्हणाले, “महाराष्ट्राला कुस्तीची समृद्ध परंपरा लाभली आहे. मात्र ग्रामीण भागातील अनेक गुणवंत खेळाडू आर्थिक अडचणींमुळे मोठ्या संधींपासून दूर राहतात. ‘पैलवान दत्तक योजना’ ही केवळ आर्थिक मदतीची योजना नसून युवा पैलवानांच्या स्वप्नांना बळ देणारी सामाजिक चळवळ आहे. उद्योग क्षेत्र, सामाजिक संस्था आणि दानशूर व्यक्तींच्या सहकार्याने भविष्यात ५० पैलवान दत्तक घेण्याचा आमचा मानस आहे. निवड झालेल्या पैलवानांनी शिस्त, कठोर परिश्रम आणि सातत्याच्या जोरावर महाराष्ट्रासह देशाचे नाव राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर उज्ज्वल करावे.”
गरीबीमुळे स्वप्ने थांबता कामा नयेत
युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे अध्यक्ष काझी अब्दुल मतीन यांनी सांगितले, या योजनेत निवड झालेली बहुतांश मुले शेतकरी आणि सर्वसामान्य कुटुंबातील आहेत. आर्थिक अडचणींमुळे कोणत्याही गुणवंत खेळाडूची स्वप्ने अपूर्ण राहू नयेत, हा या योजनेमागील मुख्य उद्देश आहे. नव्या पिढीतील होतकरू पैलवान घडविणे हे आमच्या फेडरेशनचे ध्येय असून ही योजना संपूर्ण महाराष्ट्रात विस्तारण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत.
ग्रामीण कुस्तीला मिळणार नवे बळ
देवाभाऊ केसरी फाउंडेशनचे अध्यक्ष रोहित पटेल म्हणाले, पैलवान दत्तक योजना’ ही फक्त शिष्यवृत्ती योजना नाही. ग्रामीण भागातील कुस्ती संस्कृतीला नवसंजीवनी देणारा हा उपक्रम आहे. समाजातील विविध घटकांनी पुढाकार घेतल्यास महाराष्ट्रातून अनेक राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय दर्जाचे पैलवान घडू शकतात. भविष्यात या योजनेचा विस्तार अधिक व्यापक स्वरूपात केला जाईल.
शाहू महाराजांच्या विचारांना आधुनिक सलाम
युनायटेड रेसलिंग फेडरेशन ऑफ इंडियाचे सचिव दत्तात्रय जाधव यांनी प्रास्ताविकात सांगितले, राजर्षी छत्रपती शाहू महाराजांच्या काळात तसेच त्यानंतर अनेक साखर कारखान्यांनी पैलवानांना दत्तक घेऊन त्यांना आर्थिक आधार दिला. त्याच प्रेरणेतून आधुनिक काळात ही संकल्पना नव्याने सुरू करण्याचा आमचा प्रयत्न आहे. ग्रामीण भागातील होतकरू मुलांना दर्जेदार प्रशिक्षण, पोषण आणि आर्थिक सहाय्य उपलब्ध करून देण्यासाठी ही योजना महत्त्वाची ठरेल.
दिग्गज मल्लांची उपस्थिती
या सोहळ्याला ट्रिपल महाराष्ट्र केसरी नरसिंग यादव (पोलीस उपायुक्त, मुंबई), ट्रिपल महाराष्ट्र केसरी  विजय चौधरी (सहाय्यक पोलीस आयुक्त, नवी मुंबई) तसेच डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांच्यासह कुस्ती क्षेत्रातील अनेक मान्यवर उपस्थित होते. त्यांच्या उपस्थितीने युवा मल्लांचा उत्साह आणखी उंचावला.
निवड समितीची महत्त्वपूर्ण भूमिका
या योजनेसाठी भिमराव पाटील, समिंदर जाधव, रामदास देसाई, ज्ञानेश्वर आस्वले, जालिंदर देशमुख, संजय जाधव, राहुल जाधव, आनंदा पाटील आणि अभिजित पाटील यांनी निवड समिती सदस्य म्हणून जबाबदारी पार पाडली.
महाराष्ट्राच्या आखाड्यांना नवी ऊर्जा
कार्यक्रमाला कुस्ती क्षेत्रातील मान्यवर, प्रशिक्षक, पालक, विविध सामाजिक संस्थांचे प्रतिनिधी, क्रीडाप्रेमी तसेच मोठ्या संख्येने युवा पैलवान उपस्थित होते. उपस्थितांनी पैलवान दत्तक योजना’ हा उपक्रम महाराष्ट्राच्या कुस्ती चळवळीला नवी दिशा देणारा आणि गरिबीतून झुंजणाऱ्या प्रतिभावान मल्लांच्या आयुष्याला नवी ताकद देणारा ऐतिहासिक टप्पा ठरेल, असा  विश्वास व्यक्त केला.
0000

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *