अशोक गायकवाड
नवी मुंबई : नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रामध्ये हिवताप /डेंग्यू आजाराचा प्रसार रोखण्यासाठी विविध उपाययोजना करण्यात येत असून नागरिकांमध्ये जनजागृतीही करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून महापालिका आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आषाढी एकादशीनिमित्त विठ्ठल मंदिरांमध्ये दर्शनासाठी मोठ्या प्रमाणावर भाविक येणार हे लक्षात घेत नवी मुंबई महानगरपालिका क्षेत्रातील विविध विठ्ठल रूक्मिणी मंदिरांच्या आवारात व परिसरात तेथील नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमार्फत हिवताप / डेंग्यू विषयक जनजागृती शिबीरांचे मोठ्या प्रमाणावर आयोजन करण्यात आले होते. नवी मुंबईच्या महापौर सुजाता सुरज पाटील यांनी कुकशेत येथील विठ्ठल रूक्मिणी मंदीर परिसरात आयोजित शिबिराला भेट देऊन त्याठिकाणी मांडलेल्या प्रदर्शनाची पाहणी केली व आरोग्य विभागाने पुढाकार घेऊन आयोजित केलेल्या शिबिराच्या मांडणीबद्दल समाधान व्यक्त केले. नवी मुंबई महानगरपालिका कार्यक्षेत्रातील विविध विभागांमध्ये असलेल्या २१ विठ्ठल मंदिरांमध्ये हिवताप / डेंग्यू विषयक जनजागृती शिबिरांचे आयोजन करुन त्याठिकाणी भेट देणा-या एकूण ११२०९ भाविकांमध्ये जनजागृती करण्यात आली तसेच ४५ भाविक नागरिकांचे रक्तनमुने तपासणीसाठी घेण्यात आले. या शिबिरांचे वैशिष्टय म्हणजे याठिकाणी ॲनॉफीलीस व एडीस डासांची उत्पत्तीस्थाने प्रत्यक्षात कशी असतात हे दाखवून तसेच डासांच्या अळ्या प्रत्यक्ष दाखवून डासोत्पत्ती होऊ नये याकरिता घराभोवती व घारंतर्गत असणारी डासोत्पत्ती स्थाने, उदा. पाणी साठवून ठेवलेले ड्रम हे ओढणी, धोतर किंवा साडीच्या कपड्याने झाकून ठेवणे, त्याचप्रमाणे पाणी साठविण्याची भांडी व टाक्या बंदिस्त करणे तसेच आठवड्यातून एक दिवस त्या स्वच्छ करून कोरड्या ठेवणे, घराभोवतालचे वा गच्चीवरील भंगार साहित्य, टायर्स नष्ट करणे, छतावरील प्लास्टीक शिट, ताडपत्री यामध्ये पाणी साचू न देणे, ताप येताच त्वरित डॉक्टरांना प्रकृती दाखवून त्यांचा सल्ला घेणे याबाबत जनजागृती करण्यात आली. नमुंमपा आरोग्य विभागामार्फत हिवताप / डेंग्यू प्रतिबंधासाठी आवश्यक कार्यवाही करण्यात येत असून यामध्ये नागरिकांनी जागरूक राहून आपल्या घरातील व घराभोवतालची डासोत्पत्ती स्थाने नष्ट करणे आणि आपले घर व घराचा परिसर स्वच्छ ठेवावा, उघड्यावर भंगार – टाकाऊ साहित्य पडलेले असल्यास त्यात पावसाचे पाणी साचून डासोत्पत्ती होऊ शकते हे लक्षात घेत ते नष्ट करावे आणि हिवताप / डेंग्यू आजारावर आळा घालण्यासाठी आपलेही सक्रिय योगदान द्यावे असे आवाहन महापौर सुजाता सुरज पाटील व आयुक्त डॉ.कैलास शिंदे यांच्या वतीने करण्यात येत आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *