– दिल्लीतील लाठीचार्जचा केला निषेध
 धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यानंतर केला जल्लोष
कल्याण : दिल्लीत विद्यार्थ्यांवर झालेला लाठीचार्ज व केंद्रीय मंत्री धर्मेंद्र प्रधान, यांच्या राजीनाम्यासाठी कॉकरोच जनता पार्टीच्या समर्थनार्थ आयोजित केलेल्या आंदोलनात कल्याणमध्ये फडके मैदानात तरुणाई एकवटल्याचे पाहायला मिळाले. यावेळी विद्यार्थी, तरुण आणि त्यांचे पालक देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. दुपारी शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिल्याचे वृत्त येताच आंदोलनस्थळी एकच जल्लोष करण्यात आला.
ठाणे जिल्ह्यातून सर्वच भागातून या आंदोलनासाठी तरुण सहभागी झाले होते. दिल्लीतील विद्यार्थ्यांवरील लाठीचार्ज आणि केंद्रीय शिक्षणमंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीवरून देशभर संतापाची लाट उसळली आहे. “एका प्रधानासाठी संपूर्ण देशाला सरकारने वेठीस धरले आहे,” अशी टीका आंदोलनकर्त्यांनी केली. विद्यार्थ्यांच्याच नव्हे, तर देशातील सर्वसामान्य नागरिकांच्याही भावना तीव्र असल्याचे सांगत, विद्यार्थ्यांच्या समर्थनार्थ मोठ्या संख्येने नागरिक रस्त्यावर उतरल्याचा दावा आंदोलनकर्त्यांनी केला.
तर या आंदोलनाला विविध राजकीय पक्ष आणि सामाजिक संघटना यांनी देखील पाठींबा दर्शविला. यामध्ये शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्ष, महाराष्ट्र नवनिर्माण सेना, कॉंग्रेस, राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टी शरद पवार गट, शिवसेना शिंदे गटातील काही लोकप्रतिनिधी देखील या आंदोलनात सहभागी झाले होते. तर कोणतीही अनुचित घटना घडू नये यासाठी पोलिसांनी चोख बंदोबस्त ठेवला होता. दरम्यान या आंदोलनात घुसलेल्या काही असामाजिक घटकांनी काही पत्रकारांना मारहाण केल्याची घटना घडली.
०००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *