नळपाड्यातील रहिवाशी आक्रमक
सोमवारी एसआरए कार्यालयावर धडक देणार
ठाणे : ज्या विकासकालाने गांधीनगर, सुभाष नगरचा पुनर्विकास सुमारे १५ वर्षे रखडविला आहे. त्याच विकासकाला नळपाड्याचा पुनर्विकास करण्याची सुपारी देण्यात येत आहे, असा आरोप करीत नळपाड्यातील सुमारे १५०० लोकांनी एसआरए अधिकाऱ्यांच्या या निर्णयाला विरोध करण्याची भूमिका घेतली असून सोमवारी खेवरा सर्कल येथील एसआरए कार्यालयांवर रहिवाशी धडक देणार आहेत, असे येथील रहिवाशी तथा मुख्य प्रवर्तक अमोल जानवलकर, यांनी सांगितले.
अमोल जानवलकर, जगदीश चौहाण, प्रभात सिंग, प्रदीप साहू यांनी दिलेल्या माहितीनुसार, नळपाडा येथील १५०० घरांचा पुनर्विकास करण्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. त्यासाठी एसआरए अधिकाऱ्यांनी रिट्स प्राॅपर्टी इंडिया या विकासकाला पुढे केले आहे. ही कंपनी महाकाली बिल्डर्सचा एक भाग आहे. या कंपनीला या आधी गांधी नगरमधील २२०० झोपडीधारकांनी सहमती पत्र दिले होते. त्यानंतर ४०० घरे पाडण्यात आली. मात्र, त्यांना अद्याप भाडे अदा करण्यात आलेले नाही. तसेच, सुभाष नगर येथील एसआरए प्रकल्प १५ वर्षे रखडला आहे. आता गांधीनगर येथील उर्वरित १८०० झोपडीधारकांनी घरे रिकामी करण्यास नकार दिला आहे. आर्थिक डबघाईस आलेल्या महाकाली डेव्हलपर्स संचालित रिट्स प्रॉपर्टी इंडिया या कंपनीसाठी एसआरए अधिकारी पायघड्या का घालत आहेत, असा सवाल अमोल जानवलकर यांनी उपस्थित केला.
दरम्यान, या विकासकाला विरोध करणारा पत्रव्यवहार एसआरएकडे करण्यात आलेला आहे. त्याच अनुषंगाने अधिकाऱ्यांच्या सांगण्यानुसार १२ जुलै रोजी जनरल बाॅडीची सभा घेण्यात आली होती. मात्र या बैठकीस अधिकारी उपस्थित राहिले नाहीत. तसेच, इतिवृत्त सादर करूनही कार्यवाही करण्यात आलेली नाही, असेही अमोल जानवलकर, यांनी सांगितले.
