४६ बाटल्या रक्त संकलित
दिवा : आषाढी एकादशीच्या निमित्ताने रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणे यांच्या वतीने दिवा पूर्व येथील विठ्ठल- रुक्मिणी मंदिर, विठ्ठल रुक्मिणी नगर, दातिवली रोड येथे भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. शनिवारी सकाळी १० ते दुपारी १ वाजेपर्यंत आयोजित या शिबिराला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला. या रक्तदान शिबिरामध्ये एकूण ४६ बाटल्या रक्त संकलित करण्यात आले. रक्तदात्यांनी सामाजिक बांधिलकी जपत उत्साहाने सहभाग नोंदवला. तसेच आयोजकांच्या वतीने पहिल्या १०० रक्तदात्यांना आकर्षक भेटवस्तू देण्यात आल्या.
या उपक्रमासाठी रोटरी क्लब ऑफ दिवा ठाणेचे अध्यक्ष गणेश तावरे, सचिव अंकुर मुंडे, तसेच प्रकल्प प्रमुख नंदकुमार किणे आणि  विकास गुंजाळ (सी.ए) यांनी विशेष परिश्रम घेतले. त्यावेळी साईनाथ म्हात्रे, स्वप्नील गायकर, महेंद्र दळवी, आदित्य पाटील, किशोर पाटील, प्रतीक बेडेकर, डॉ. पराग जोशी हे मान्यवर उपस्थित होते.  आषाढी एकादशीच्या दिवशी रक्तदानासारख्या जीवनदायी कार्याचे आयोजन करून रोटरी क्लबने समाजासमोर सेवा आणि मानवतेचा आदर्श ठेवला. उपस्थितांनी भविष्यातही अशा सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्याची अपेक्षा व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *