मुंबई: मराठी म्हणी आणि वाक्प्रचार नव्या पिढीपर्यंत हसत-खेळत पोहोचविण्याच्या उद्देशाने तयार करण्यात आलेल्या ‘चित्रमय म्हणी आणि वाक्प्रचार’ या पुस्तकाच्या प्रकाशनानिमित्त सांताक्रूझ येथील ओला वाकोला बँक्वेट हॉलमध्ये ‘कॉफी विथ कार्टूनिस्ट्स’ हा खुला पॉडकास्ट नुकताच आयोजित करण्यात आला. या कार्यक्रमाला व्यंगचित्र रसिकांनी भरपूर प्रतिसाद दिला. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या हस्ते या पुस्तकाचे प्रकाशन झाले. याप्रसंगी पुस्तकाचे संपादक संजय मिस्त्री, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, पुस्तकाचे निर्माते संदेश चव्हाण आणि ज्येष्ठ व्यंगचित्रकार प्रशांत कुलकर्णी आदी मान्यवर उपस्थित होते.
जुन्या मराठी म्हणी वाक्प्रचारांना व्यंगचित्रांच्या माध्यमातून जिवंत करण्याचा प्रयत्न या पुस्तकातून करण्यात आला आहे. याच संकल्पनेतून हा खुला पॉडकास्ट घेण्यात आला, अशी माहिती आयोजक आणि ओला वाकोलाचे सीईओ तसेच कार्टूनिस्ट्स कॅफे क्लबचे विद्यार्थी असलेले संदेश चव्हाण यांनी दिली. या पॉडकास्टमध्ये गेली चार दशके व्यंगचित्र क्षेत्रात कार्यरत असलेले प्रशांत कुलकर्णी आणि संजय मिस्त्री यांनी पुस्तकातील चित्रांमागील कल्पना, त्यांचा अर्थ आणि व्यंगचित्रकलेतील विविध अनुभव रसिकांसमोर मांडले. जागतिक दर्जाच्या पॉडकास्ट सेटअपमध्ये झालेल्या या संवादामुळे भर पावसातही श्रोते तब्बल अडीच तास खिळून बसले होते.
कार्यक्रमाच्या उत्तरार्धात प्रशांत कुलकर्णी, विवेक प्रभूकेळूसकर आणि उमेश कवळे या प्रसिद्ध व्यंगचित्रकारांनी लाईव्ह व्यंगचित्र रेखाटनाचे प्रात्यक्षिक सादर केले. यावेळी प्रशांत कुलकर्णी यांनी शरद पवार यांचे अर्कचित्र काढताना त्यांच्या आवाजाची हुबेहूब नक्कल करून उपस्थितांची मने जिंकली. कार्यक्रमाची सांगता सुप्रसिद्ध अर्कचित्रकार प्रभाकर वाईरकर यांचे लाईव्ह अर्कचित्र रेखाटून संजय मिस्त्री यांनी केली. या कार्यक्रमाला ‘महाराष्ट्र टाइम्स’चे संजीव साबडे, ग्रंथालीचे सुदेश हिंगलासपूरकर, मराठी चित्रपट दिग्दर्शक आचरेकर, संगीतकार स्वरूप होनप, जादूगार सागर पटेल यांच्यासह अनेक डॉक्टर, अभियंते आणि व्यंगचित्रप्रेमी उपस्थित होते. कार्यक्रमानंतर ओला वाकोला रेस्टॉरंटतर्फे उपस्थितांना भोजनाची मेजवानी देण्यात आली. अनेक व्यंगचित्रकार एकत्र आल्याने हा कार्यक्रम छोटेखानी व्यंगचित्रकार संमेलनासारखा भासला, अशी प्रतिक्रिया उपस्थितांनी व्यक्त केली.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *