३० जुलैला नागरिकांना सहभागी होण्याचे आवाहन
दिवा: दिवा शहरातील रस्त्यांवरील वाढत्या खड्ड्यांच्या समस्येविरोधात महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने अनोख्या पद्धतीने आंदोलन छेडण्याचा निर्णय घेतला. “खड्ड्यांची शांती” या आंदोलनाचे आयोजन गुरुवार, ३० जुलै, सकाळी ११.३० वाजता छत्रपती शिवाजी महाराज चौक, दिवा (पूर्व) येथे करण्यात येणार आहे. मनसेच्या प्रसिद्धी पत्रकानुसार, दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवा शहरातील अनेक रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले असून, यामुळे नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. मात्र, या गंभीर समस्येकडे ठाणे महापालिकेच्या सार्वजनिक बांधकाम विभागाकडून दुर्लक्ष होत असल्याचा आरोप करण्यात आला आहे.
रस्त्यांवरील खड्ड्यांमुळे वाहनचालक आणि पादचाऱ्यांच्या सुरक्षिततेचा प्रश्न निर्माण झाला असून, प्रशासनाने तातडीने उपाययोजना कराव्यात, अशी मागणी मनसेने केली आहे. या पार्श्वभूमीवर खड्ड्यांनाच विनंती करून नागरिकांना होणारा त्रास थांबवण्याचा प्रतीकात्मक संदेश देण्यासाठी “खड्ड्यांची शांती” आंदोलन आयोजित करण्यात आले आहे. या आंदोलनात दिवा शहरातील नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रस्त्यांच्या दुरुस्तीची मागणी अधिक तीव्र करावी, असे आवाहन महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने केले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *