मुंबई :  चेंबूर जिमखान्याच्यावतीने आणि महाराष्ट्र कॅरम असोसिएशन आणि मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेच्या मान्यतेने आयोजित केलेल्या ५ व्या राज्य मानांकन कॅरम स्पर्धेत पुरुष एकेरी गटाच्या अंतिम सामन्यात मुंबईच्या विश्व् विजेत्या प्रशांत मोरेने अनुभवी माजी राष्ट्रीय विजेत्या संजय मांडेला २५-७, २५-१० असे सरळ दोन सेटमध्ये पराभूत करून विजय संपादन केला. या गटाच्या तिसऱ्या क्रमांकासाठी झालेल्या लढतीत ठाण्याच्या पंकज पवारने मुंबईच्या राहुल सोलंकीला २५-१५, २५-२२ असे नमवले. तत्पूर्वी उपांत्य फेरीत मुंबईच्या संजय मांडेने ठाण्याच्या पंकज पवारवर २३-१७, २४-१५ व मुंबईच्या प्रशांत मोरेने मुंबईच्या राहुल सोलंकीवर २५-१९, २५-१० अशी मात केली होती.
महिला एकेरीच्या अंतिम सामन्यात ठाण्याची मधुरा देवळे सरस ठरली. तिने रत्नागिरीच्या आकांक्षा कदमवर सरळ दोन सेटमध्ये २४-१८, २५-६ असा विजय मिळवला. तर तिसऱ्या क्रमांकाच्या लढतीत मुंबईच्या प्राजक्ता नारायणकरने मुंबईच्या मैत्रीयी गोगटेवर १६-१७, २०-१५ व २२-१५ असा विजय मिळवला. अंतिम फेरीत प्रवेश करण्यापूर्वी आकांक्षा कदमने तीन सेटमध्ये  प्राजक्ता नारायणाचा ०-२५, २२-२० व २३-११ तर मधुरा देवळेने तीन सेट नंतर मैत्रेयी गोगटेचा ८-२३, २३-४ व २५-० असा विजय मिळवला होता.
विजेत्या खेळाडूंना प्रमुख पाहुणे जिमखान्याचे अध्यक्ष श्री सुरिंदर शर्मा, उपाध्यक्ष श्री श्याम अगरवाल, स्पोर्ट्स सचिव श्री रणजित धामी, सह सचिव श्री पी. एम. बाला, कॅरम आणि बुद्धिबळ विभागाचे सचिव बाळकृष्ण परब, स्पर्धेचे प्रायोजक एन. एल. गुप्ता, महाराष्ट्र कॅरम असोसिएशनचे उपाध्यक्ष यतिन ठाकूर, मानद सचिव अरुण केदार, खजिनदार अजित सावंत, सह सचिव केतन चिखले व मुंबई उपनगर जिल्हा कॅरम संघटनेचे कार्याध्यक्ष श्री संतोष चव्हाण यांच्या हस्ते रोख पारितोषिके, चषक व प्रविण्य प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले.
००००००००००

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *