३री आशियाई ज्युनियर पिकलबॉल स्पर्धा
थायलंड येथे येत्या २८ ते ३१ जुलै ला ऑल इंडिया पिकलबॉल असोसिएशन (AIPA) ने आशिया फेडरेशन ऑफ पिकलबॉल (AFP) यांच्या वतीने आयोजित करण्यात येणाऱ्या तिसऱ्या आशियाई ज्युनियर पिकलबॉल स्पर्धेसाठी भारताच्या ३४ सदस्यीय ज्युनियर संघाची घोषणा केली आहे. आशियातील अव्वल युवा खेळाडू या स्पर्धेत सहभागी होणार असून, ही स्पर्धा AFP च्या प्रतिष्ठित एशिया पिकलबॉल ज्युनियर ओपन मालिकेचा भाग आहे.
भारतीय संघ १९ वर्षांखालील, १६ वर्षांखालील, १४ वर्षांखालील आणि १२ वर्षांखालील गटांमध्ये सहभागी होणार आहे. महाराष्ट्र, मध्य प्रदेश, कर्नाटक, दिल्ली, छत्तीसगड, पंजाब, हरियाणा, झारखंड आणि चंदीगड या राज्यांतील खेळाडूंना संघात संधी देण्यात आली असून, भारतात ज्युनियर पिकलबॉलचा वाढता प्रसार यामुळे अधोरेखित झाला आहे.
या आशियाई स्पर्धेमुळे भारतीय युवा खेळाडूंना आंतरराष्ट्रीय स्तरावर खेळण्याचा अनुभव मिळणार असून, आशियातील सर्वोत्तम प्रतिस्पर्ध्यांविरुद्ध आपली गुणवत्ता सिद्ध करण्याची संधी उपलब्ध होणार आहे. तसेच AFP च्या नियोजित विकास कार्यक्रमाचा भाग म्हणून खेळाडूंना भविष्यातील ज्युनियर आणि कॉलेजिएट पिकलबॉल विश्वचषक स्पर्धांसाठी तयारी करण्यासही मदत होणार आहे.
भारतीय ज्युनियर संघाचा अधिकृत किटिंग भागीदार असलेल्या स्केचर्स इंडियाकडून संघातील सर्व खेळाडूंना स्पर्धेसाठी अधिकृत जर्सी तसेच उच्च दर्जाचे पिकलबॉल शूज उपलब्ध करून दिले जाणार आहेत. AIPA चे अध्यक्ष अरविंद रमेश प्रभू यांनी सांगितले की, ही स्पर्धा भारतीय युवा खेळाडूंना अमूल्य आंतरराष्ट्रीय अनुभव देईल आणि त्यांच्या कौशल्य विकासाला मोठी चालना मिळेल. तसेच संघाला जागतिक दर्जाचे क्रीडा साहित्य आणि शूज उपलब्ध करून दिल्याबद्दल त्यांनी स्केचर्स इंडियाचे आभार मानले. भारतातील पिकलबॉलचे राष्ट्रीय नियामक म्हणून AIPA देशभरात या खेळाचा प्रसार, युवा खेळाडूंचा विकास आणि तळागाळापासून आंतरराष्ट्रीय यशापर्यंतचा भक्कम मार्ग तयार करण्यासाठी सातत्याने कार्यरत आहे.
०००००००
