लाईट ऑफ लाइफ ट्रस्ट – टास्कफोर्स कर्जत विभागातर्फे
अशोक गायकवाड
रायगड-र्जत : रविवार, २६ जुलैला कर्जत तालुक्यातील बार्डी येथे लाईट ऑफ लाइफ ट्रस्टच्या टास्कफोर्स कर्जत विभागामार्फत टास्कफोर्स सदस्यांसाठी प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले. कार्यक्रमाची सुरुवात दीपप्रज्वलन व मान्यवरांच्या स्वागताने झाली. टास्कफोर्स रिजनल बॉडीचे अध्यक्ष साहिल कदम यांनी प्रास्ताविक करून प्रशिक्षण शिबिराचा उद्देश स्पष्ट केला. त्यानंतर आनंदो प्लस प्रकल्प समन्वयक दशरथ देशमुख आणि टास्कफोर्स रिजनल बॉडीच्या उपाध्यक्षा दीक्षिता गोगटे यांनी “स्वतःची ओळख, स्वप्ने, ध्येय आणि सामाजिक जबाबदारी” या विषयावर विद्यार्थ्यांना प्रेरणादायी मार्गदर्शन केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन मोहिली सेंटरच्या सहाय्यक सेंटर लीडर दीक्षा सोनावणे यांनी केले. प्रशिक्षणाचा प्रत्यक्ष अनुभव मिळावा या उद्देशाने बार्डी गावात विविध सामाजिक उपक्रमांचे आयोजन करण्यात आले. टास्कफोर्स सदस्यांनी स्वच्छता, शिक्षण आणि व्यसनमुक्ती या विषयांवर जनजागृती रॅली काढून ग्रामस्थांमध्ये सामाजिक जागरूकता निर्माण केली. याचबरोबर ग्रामस्थांसाठी मोफत आरोग्य तपासणी करण्यात आली आणि रुग्णांना गरजेनुसार गोळया आणि औषधे देण्यात आल्या तसेच नेत्रतपासणी शिबिर आयोजित करण्यात आले, ज्याचा ५१ नागरिकांनी लाभ घेतला. तसेच १०० ग्रामस्थांचे आयुष्यमान भारत व आभा कार्ड तयार करून देण्यात आले. या सर्व उपक्रमांमध्ये कर्जत विभागातील टास्कफोर्सचे ४५ सदस्य सक्रियपणे सहभागी झाले होते. या उपक्रमासाठी डॉ. बन्सीलाल पाटील, पियुष ऑप्टिकल अँड कॉन्टॅक्ट लेन्स सेंटरचे महेश गुप्ता तसेच अर्जुन इंटरप्राईजेसचे अर्जुन लाड यांचे विशेष सहकार्य लाभले. लाईट ऑफ लाइफ ट्रस्टचे प्रकल्प समन्वयक दशरथ देशमुख, सहाय्यक समन्वयक पंकज कांबळे यांच्या मार्गदर्शनाने तसेच पौर्णिमा कांबरी, वैभवी विरले, प्रांजल कांबरी, प्रथमेश ठाकरे आणि आदित्य ठोंबरे या बार्डी गावातील टास्कफ़ोर्स सदस्यांच्या मोलाच्या सहकार्यामुळे हे प्रशिक्षण शिबिर व सर्व सामाजिक उपक्रम यशस्वीरीत्या पुर्ण झाले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *