नशा मुक्त भारत अभियान २०२६’ अंतर्गत
ठाणे : युवा कार्यक्रम व क्रीडा मंत्रालय, भारत सरकार यांच्या मेरा युवा भारत (MY Bharat) – ठाणे तथा नॅशनल कॅडेट कॉर्प्स (NCC) यांच्या संयुक्त विद्यमाने ‘नशा मुक्त भारत अभियान २०२६’ अंतर्गत “नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत” या संकल्पनेवर आधारित जिल्हास्तरीय विविध स्पर्धांचे आयोजन ठाण्यातील बांदोडकर कॉलेज येथे उत्साहात पार पडले.
कार्यक्रमाचे उद्घाटन प्रसिद्ध मराठी अभिनेते कुशल भद्रिके, अभिजित चव्हाण आणि संतोष जुवेकर यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी कॉलेजचे प्राचार्य प्रा. डॉ. विंदा मांजरमकर तसेच उपप्राचार्या प्रा. प्रीती जांभुळकर यांची प्रमुख उपस्थिती लाभली. उपस्थित मान्यवरांनी युवकांना व्यसनमुक्त जीवनशैलीचा स्वीकार करून “नशा मुक्त युवा फॉर विकसित भारत” या अभियानात सक्रिय सहभाग नोंदविण्याचे तसेच विकसित भारताच्या निर्मितीत योगदान देण्याचे आवाहन केले.
या स्पर्धांमध्ये जिल्ह्यातील १५ ते २९ वर्षे वयोगटातील युवक-युवती, महाविद्यालयीन विद्यार्थी, युवक मंडळे तसेच स्वयंसेवकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला. स्पर्धांमध्ये संगीत व रॅप (गट), थीमॅटिक नृत्य (गट), रील मेकिंग व लघुपट निर्मिती, नुक्कड नाटक, स्लॅम पोएट्री, वादविवाद/वक्तृत्व, चित्रकला तसेच घोषवाक्य लेखन अशा एकूण आठ स्पर्धांचे आयोजन करण्यात आले. स्पर्धकांनी आपल्या कलागुणांच्या माध्यमातून व्यसनमुक्त भारताचा प्रभावी संदेश समाजापर्यंत पोहोचविला. स्पर्धांमधील उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या विजेत्यांना मेरिट प्रमाणपत्र व पदक देऊन गौरविण्यात आले, तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना सहभाग प्रमाणपत्र प्रदान करण्यात आले. प्रत्येक स्पर्धेतील प्रथम क्रमांक प्राप्त स्पर्धक राज्यस्तरीय स्पर्धेत ठाणे जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार असून, राज्यस्तरावर उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्या स्पर्धकांना राष्ट्रीय स्तरावरील स्पर्धेत सहभागी होण्याची संधी मिळणार आहे.
00000
