कल्याण : कल्याण पूर्वेतील नेतिवली चौक परिसरातील कोकण किनारा हॉटेलमध्ये अज्ञात चोरट्याने मध्यरात्री घरफोडी करून २८ हजारांची रोकड आणि एका ग्राहकाचा मोबाईल फोन लंपास केला. या प्रकरणी कोळसेवाडी पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरोधात गुन्हा दाखल करून तपास सुरू केला आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हॉटेल व्यवस्थापक सुरेश शेट्टी यांच्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ही घटना २३ जुलै रोजी पहाटे १ ते सकाळी १० वाजण्याच्या दरम्यान घडली. चोरट्याने हॉटेलच्या पहिल्या मजल्यावरील महिला स्वच्छतागृहाच्या खिडकीची काच काढून आत प्रवेश केला. त्यानंतर तळमजल्यावरील कॅश काऊंटरच्या दोन्ही ड्रॉवरचे कुलूप तोडून त्यामधील २८ हजारांची रोकड आणि एका ग्राहकाचा मोबाईल फोन चोरून नेला. घटनेची माहिती मिळताच कोळसेवाडी पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे आरोपीचा शोध सुरू असून पुढील तपास सुरू आहे.
0000000
