सीसीटीव्ही कॅमेरे बंद असल्याने सुरक्षेवर प्रश्नचिन्ह
कल्याण : कल्याण पश्चिमेतील काळा तलावात मंगळवारी एका १७ वर्षीय अल्पवयीन तरुणीचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली आहे. या तरुणीने आत्महत्या केली की, तिला तलावात ढकलून हत्या केली हा प्रश्नचिन्ह निर्माण झाला असून या प्रकरणाचा पुढील तपास पोलिस करीत आहेत. या घटनेमुळे तलाव परिसरातील सीसीटीव्ही बंद असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. याविषयी महापौर हर्षाली चौधरी आणि मनसे नगरसेवक गणेश लांडगे यांनी संताप व्यक्त केला आहे.
हि तरुणी बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या आई वडिलांनी कल्याणच्या बाजारपेठ पोलिस ठाण्यात सोमवारी दिली होती. या प्रकरणी पोलिसांनी तपास सुरु केला, मात्र मंगळवारी सायंकाळी चारच्या सुमारास मृतदेह काळा तलावात आढळून आला. तिचा मृतदेह तलावातून बाहेर काढून शवविच्छेदनासाठी रुक्मीणीबाई रुग्णालयात पाठविण्यात आला असून या तरुणीने तलावात उडी मारुन आत्महत्या केल्याचा संशय प्रथमदर्शनी व्यक्त केला जात असला तरी तिला कोणी ढकलून दिले का त्यामुळे तिचा तलावात बुडून मृत्यू झाला या बाजूनेही बाजारपेठ पोलिसांनी तपास सुरु केला आहे.
ऐतिहासिक पार्श्वभूमी असलेल्या या तलावाचा विकास स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत करण्यात आला आहे. या तलावाच्या विकासासाठी १९ कोटी रुपये खर्च करण्यात आले आहे. या तलाव परिसरात ३२ सीसीटीव्ही बसवण्यात आले आहेत. सायंकाळी तरुणीचा मृतदेह तलावात मिळून आल्याने नक्की घटना कशी घडली हे सीसीटीव्हीत पाहता येईल यासाठी पोलिसांनी प्रयत्न सुरु केले. तेव्हा तलाव परिसरातील ३२ सीसीटीव्ही बंद अवस्थेत असल्याची धक्कादायक बाब समोर आली.
या प्रकरणी मनसे नगरसेवक गणेश लांडगे आणि विभाग प्रमुख कपिल पवार यांनी महापालिका मुख्यालयात धाव घेत महापौर हर्षाली चौधरी यांची भेट घेतली. यावेळी विद्युत विभागाचे अतिरिक्त शहर अभियंता प्रशांत भागवत आणि मुख्य उद्यान अधीक्षक संजय जाधव यांच्याकडे याबाबत विचारणा करुन संताप व्यक्त केला. सीसीटीव्ही लावले असले तरी त्यांची देखभाल दुरुस्तीच केली जात नसल्याची बाब याघटनेच्या निमित्ताने उघड झाली आहे. महापौर हर्षाली चौधरी यांनी अधिकार्यांसमवेत काळा तलाव येथे धाव घेऊन तलाव परिसराची पाहणी केली. तसेच तलावाच्या सुरक्षेसंदर्भात योग्य त्या उपाययोजना करण्याच्या सूचना संबंधित अधिकाऱ्यांना केल्या.
