कल्याण : फार्मसी शिक्षणातील गुणवत्ता, आधुनिक शैक्षणिक सुविधा आणि विद्यार्थी-केंद्रित उपक्रमांच्या जोरावर डोंबिवली मधील एम्स कॉलेज ऑफ फार्मसीला महाराष्ट्र राज्य तंत्रशिक्षण मंडळ (एमएसबीटीई) कडून शैक्षणिक गुणवत्ता मूल्यमापनात उत्कृष्ट श्रेणी प्रदान करण्यात आली आहे. हे मानांकन संस्था, प्राध्यापक, कर्मचारी आणि विद्यार्थ्यांच्या सामूहिक प्रयत्नांची महत्त्वपूर्ण दखल मानली जात आहे.
महाविद्यालयाने अध्यापनातील गुणवत्ता, प्रभावी शैक्षणिक व्यवस्थापन, आधुनिक प्रयोगशाळा, अद्ययावत पायाभूत सुविधा, उद्योगाभिमुख शिक्षण आणि विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी राबविलेल्या उपक्रमांच्या आधारे ही उल्लेखनीय कामगिरी साध्य केली आहे. या यशामुळे संस्थेच्या गुणवत्तापूर्ण शिक्षणाची पुन्हा एकदा राज्यस्तरावर नोंद झाली आहे. महाविद्यालयाच्या व्यवस्थापनाने, प्राचार्य, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी आणि विद्यार्थ्यांचे या यशाबद्दल अभिनंदन करताना, भविष्यातही गुणवत्तापूर्ण शिक्षण, संशोधन, कौशल्य विकास आणि उद्योगाभिमुख प्रशिक्षण यावर अधिक भर देण्याचा निर्धार व्यक्त केला.
यावेळी महाविद्यालय प्रशासनाने सांगितले की, “एमएसबीटीईकडून मिळालेली ‘उत्कृष्ट’ श्रेणी ही केवळ सन्मानाची बाब नसून विद्यार्थ्यांना अधिक दर्जेदार शिक्षण आणि उत्तम करिअरच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या आमच्या वचनबद्धतेची पोचपावती आहे. आगामी काळातही शैक्षणिक गुणवत्ता आणि नवोपक्रमाच्या माध्यमातून उत्कृष्टतेचा हा प्रवास कायम ठेवला जाईल.” फार्मसी क्षेत्रात सक्षम, कुशल आणि जबाबदार व्यावसायिक घडविण्याच्या उद्देशाने कार्यरत असलेल्या एम्स कॉलेज ऑफ फार्मसी डोंबिवलीने अल्पावधीतच गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी स्वतंत्र ओळख निर्माण केली असून,  एमएसबीटीईचे हे मानांकन त्या प्रवासातील आणखी एक महत्त्वाचा टप्पा ठरला आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *